अमरावती : परीक्षा प्रणालीत शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची जबाबदारी निश्चित करण्यात येणार आहे. त्यामुळे परीक्षा काळात त्यांना आंदोलनाचा अधिकार राहणार नाही, असे उच्च व तंत्र शिक्षणमंत्री तावडे यांनी स्पष्ट केले. महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ कायद्याच्या मसुद्यातील काही मुद्द्यांची माहिती त्यांनी दिली. यंदाच्या हिवाळी अधिवेशनात हा कायदा सभागृहासमोर मांडण्यात येणार आहे.संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या दृकश्राव्य सभागृहात रविवारी झालेल्या ‘नवीन प्रस्तावित विद्यापीठ कायदा’ या विषयावरील परिसंवादात मंत्री विनोद तावडे बोलत होते. विद्यापीठातील बदलत्या शैक्षणिक क्षेत्राचा अभ्यास करून, तसेच विद्यार्थ्यांना केंद्रस्थानी ठेवून प्रस्तावित महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ कायदा २०१५ तयार करण्यात आला आहे. पुढील २० वर्षांचा कालाखंड डोळ्यांसमोर ठेवून निर्णयप्रक्रियेत विद्यार्थ्यांचे स्थान, नेतृत्वगुणांच्या विकासासाठी विद्यार्थी परिषदेच्या निवडणुका, विद्यार्थ्यांचे नुकसान टाळण्याकरिता तक्रार निवारण केंद्र, अधिसभेवर सर्व घटकांचे योग्य प्रतिनिधीत्व आदी महत्त्वाच्या तरतुदी या कायद्यात केल्याचे तावडे म्हणाले.विद्यार्थ्याला मातीचा गोळा समजून शिक्षकांनी त्या गोळ्याला आकार द्यावा, ही संकल्पना आता कालबाह्य झाली असून, विद्यार्थ्यांच्या कौशल्यांचा विकास करण्याचे ध्येय आजच्या शिक्षकांनी ठेवावे, असा सल्ला तावडे यांनी उपस्थितांना दिला, तसेच कुलगुरूंचे पद सर्वात मोठे आहे. त्यामुळे त्यांना मंत्रालयात येण्याची गरज नाही, मंत्र्यांची प्रतीक्षा करण्याचीदेखील त्यांना आवश्यकता नाही. कुलगुरूपदाचे मोठेपण जपण्यासाठी नवीन तरतुदी करण्यात आल्या आहेत, असेही ते म्हणाले. परिसंवादापूर्वी तावडे यांनी विद्यापीठातील मानव संसाधन विकास केंद्र अतिथीगृहाचे लोकार्पण केले.
शिक्षकांना परीक्षेच्या काळात आंदोलनबंदी
By admin | Published: November 02, 2015 2:59 AM