ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 20 - SNDT विद्यापीठाने विद्यार्थिनींसाठी तयार केलेल्या ड्रेस कोडविरोधात निषेध आंदोलन करण्यात आले.
विद्यार्थिंनी शॉर्ट्स, मिडी घालून या निर्णयाचा निषेध केला. चर्चगेट येथील SNDT विद्यापीठाच्या गेटसमोर हे आंदोलन करण्यात आले. 'SNDT विद्यापीठाकडून विद्यार्थ्यांना स्वातंत्र्याचे धडे शिकवायचे सोडून विद्यार्थ्यांवर तालिबानी फतवे लादण्यात येत आहेत. मुलींचे पहिले विद्यापीठ म्हणत असताना मुलींना पोषाख घालण्याच्या पद्धतीत अडकावण्याचे काम विद्यापीठ करत आहे.
मुलींनी काय कपडे घालायचे हे देखील आता विद्यापीठ आणि विद्यार्थी कल्याण विभाग ठरवणार का?', असा सवाल विद्यार्थी भारती राज्याध्यक्षा विजेता भोनकर यांनी केला आहे. SNDT विद्यापीठ आणि विद्यार्थी कल्याण विभागाने मुलींच्या ड्रेसकोडबद्दल फतवा काढला आहे. मुलींनी विद्यापीठात येताना संपूर्ण ड्रेस घालायचा आहे आणि जीन्स, शॉर्ट्स, मिडी या सर्व कपड्यांवर बंदी आणलेली आहे. इतकेच नाही तर या निर्णयामुळे सर्व विद्यार्थिनी खूश आहेत, असे खोटे आणि चुकीचे विधान SNDT च्या कुलगुरूंनी केल्याचा आरोप विद्यार्थी भारती कार्यवाह स्मिता साळुंखे यांनी केला आहे.
' मुलींनी काय घालायचे आणि काय घालायचे नाही, याचे निर्णय विद्यापीठ आणि कल्याण विभागाने घेऊ नये. एकविसाव्या शतकात असे तालिबानी फतवे एखाद्या विद्यापीठाने काढणे शोभत नाही', असे विधान विद्यार्थी भारती उपाध्यक्ष राकेश सुतार यांनी केले आहे.