ठाणे : सैन्य भरतीची प्रश्नपत्रिका फोडणाऱ्या आरोपींच्या आर्थिक व्यवहारांचे धागेदोरे ठाणे पोलिसांच्या हाती लागले आहेत. एका आरोपीच्या बँक खात्यातील व्यवहारांवर पोलिसांना संशय आला असून ते खाते गोठवण्याच्या हालचाली पोलिसांनी सुरू केल्या आहेत.सैन्य भरती मंडळातर्फे (आर्मी रिक्रुटमेंट बोर्ड) २६ फेब्रुवारी रोजी लिपिक आणि ट्रेड्समनसह ४ पदांसाठी देशभरात घेतलेल्या परीक्षेची प्रश्नपत्रिका फोडणाऱ्या टोळीचा पर्दाफाश ठाणे पोलिसांनी गत महिन्यात केला. याप्रकरणी पोलिसांनी एकूण २४ आरोपींना अटक केली आहे. नागपूर सैन्य भरती कार्यालयातील रविकुमार, धरमवीर सिंग आणि निगमकुमार पांडे हे तिघे लिपिकवर्गीय कर्मचारी या प्रकरणातील मुख्य आरोपी आहेत. सैन्य भरतीचे प्रशिक्षण देणाऱ्या संस्थाचालकांपर्यंत प्रश्नपत्रिका पोहोचवण्यात सातारा जिल्ह्यातील फलटण येथील संतोष भीमराव शिंदे याचीही मुख्य भूमिका होती. प्रश्नपत्रिकेचा सौदा १ कोटी ३५ लाख रुपयांमध्ये निश्चित करून, ५० लाख रुपये अग्रीम आरोपींना देण्यात आले होते. या पैशांच्या जप्तीसाठी पोलिसांनी प्रयत्न सुरू केले आहेत. आतापर्यंतच्या तपासामध्ये संतोष शिंदे याच्या खात्यातील व्यवहार संशयास्पद असल्याचे पोलिसांना आढळले. अवघ्या दोन महिन्यांत त्याच्या खात्यात १० लाख रुपयांचा व्यवहार झाल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. त्यापैकी ६ लाख रुपये त्याने खर्च केले असून पुढील व्यवहार टाळण्यासाठी त्याचे खाते गोठवण्याच्या हालचाली पोलिसांनी सुरू केल्या आहेत. त्यासाठी ठाणे गुन्हे शाखेचे एक पथक फलटण येथे रवाना झाले आहे. चौकशीत पठाणकोट येथील एका जवानाचे नाव समोर आल्याची माहिती सूत्रांनी दिली. यासंदर्भात गुन्हे शाखेला विचारणा केली असता ही माहिती अतिशय प्राथमिक स्तरावरील असल्याचे त्यांनी सांगितले. (प्रतिनिधी)
आरोपींचे बँक खाते गोठवण्यासाठी हालचाली
By admin | Published: March 07, 2017 1:48 AM