- ऑनलाइन लोकमत
२७ लाखांची सोन्याची नाणी जप्त: विशाखापट्टणम येथून घेतले ताब्यात
पुणे, दि. 27 - अक्षय कुमारच्या ‘स्पेशल २६’ चित्रपटातील स्टाईलने सराफाला गंडा घालणा-या चोरट्यास पोलीसांनी जेरबंद केले. या चोरट्याने कंपनीतील कर्मचा-यांना १२० सोन्याची नाणी दिवाळी बोनस म्हणून द्यायची असल्याचे सांगून ३२ लाख ५० हजार ५४४ रुपयांना गंडा घातला होता़ चंदननगर पोलिसांनी विशाखापट्टम येथून त्याला पकडले असून २७ लाख २० हजार रुपयांची ९३ सोन्याची नाणी जप्त केली आहेत़
खराडीतील रिगस ऑरगॉन टेक वर्ल्ड ट्रेड सेंटर युऑन आयटी पार्कमध्ये २६ नोव्हेंबर २०१५ मध्ये ही घटना घडली होती़ साबारी अरूमूगम गणेशन (वय ४०, रा. आण्णा प्रॉपर्टीज, चेप्पानम, पनानगड, कोचीन, केरळ) असे या चोरट्याचे नाव आहे.
साबारीने कोरेगाव पार्कमधील एका पंचतारांकित हॉटेलमध्ये खोट्या नावाने खोली घेतली़ हॉटेलमधूनच बुक केलेल्या मोटारीच्या चालकाला आपली मल्टिनॅशनल कंपनी असून कंपनीतील कर्मचाºयांना ८ व १० ग्रॅमची सोन्याची नाणी दिवाळी बोनस म्हणून द्यायची आहेत़ कोणी ज्वेलर्स ओळखीचे आहेत का? असे विचारले. या चालकाने चंदननगर येथील सराफाकडे कामास असलेल्या खैरे यांची ओळख सांगितली. खैरे नाणी घेऊन आले. ‘आमच्या मॅनेजरना आवडणार नाही. तुम्ही येथेच थांबा,’ असे सांगून तो हॉटेलच्या रुममधये गेला. १५ ते २० मिनिटे झाली तरी तो बाहेर न आल्याने त्यांनी आत केबिनमध्ये जाऊन पाहिले, तर केबिनच्या दुसºया दरवाजातून तो पळून गेल्याचे आढळून आले़ फसविल्याचे लक्षात येताच खैरे यांनी पोलिसांकडे धाव घेतली़ पोलिसांनी आरोपीने कशाप्रकारचे गुन्हा केला आहे त्याबाबतची माहिती इतर राज्यातील पोलिसांना ई-मेल करून पाठविली होती.
गणेशनने अशाप्रकारे विशाखापट्टणम आणि तिरूचिरापल्ली येथे गुन्हे केले होते. त्या गुन्हयात विशाखापट्टणम पोलिसांनी त्याला अटक केली होती. चंदननगर पोलिसांनी विशाखापट्टणम येथे जावुन त्याला न्यायालयाच्या परवानगीने ताब्यात घेतले. आरोपीला न्यायालयात हजर करून त्याची पोलिस कोठडी घेण्यात आली. त्याने गुन्हयाची कबुली देवुन सोन्याची नाणी ही त्याच्या चुलत भावाकडे ठेवल्याचे सांगितले. सह आयुक्त सुनिल रामानंद, उपायुक्त कल्पना बारवकर यांच्या मार्गदशर्नाखाली वरिष्ठ निरीक्षक अनिल पात्रुडकर, उपनिरीक्षक एस.एल. साळुंखे, कमर्चारी तानाजी पवार, अजित धुमाळ, श्रीकांत कुरकेल्ली, दीपक चव्हाण अमोल गायकवाड आणि अमोल पिलाणे यांच्या पथकाने २१ आॅगस्ट रोजी एर्लाकुलम येथे जावुन गणेशन याचा चलुत भाऊ सुकुमारन आयास्वामी पिल्ले यांच्याकडून २७ लाख २० हजार रूपये किंमतीची ८५१ ग्रॅम वजनाची ९३ सान्याची नाणी जप्त केली आहेत. त्यामध्ये १० ग्रॅमच्या ५३ तर ८ ग्रॅमच्या ४० नाण्यांचा समावेश आहे. आरोपीला पुन्हा विशाखापट्टणम पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.