लोकमत न्यूज नेटवर्कपुणे : जातीजातींमध्ये वैमनस्यांचे वातावरण तयार करण्याचा प्रयत्न होत असल्याच्या सध्याच्या काळात भारतभर फिरून राष्ट्रीय एकात्मतेचा संदेश देणारे संत नामदेव यांच्या जीवनकार्याची महती जगाला पटवून देण्याचा प्रयत्न करण्यासाठी पुण्यातील एका स्वयंसेवी संस्थेने पुढाकार घेतला असून संत नामदेव यांच्यावरील चित्रपट चार भाषांमध्ये मोठ्या पडद्यावर झळकणार आहे़ प्रसिद्ध अभिनेते गोविंद नामदेव यांच्या संकल्पनेतून हा चित्रपट साकारला जात आहे़ या चित्रपटासाठी गोविंद नामदेव हे गुरुवारी पुण्यात आले असताना त्यांनी ‘लोकमत’ला या चित्रपटाविषयी आपल्या भावना व्यक्त केल्या़ नामदेव म्हणाले, आम्ही मूळचे संत नामदेवांचे अनुयायी आहोत़ गेल्या चित्रपटसृष्टीत नावलौकिक मिळाल्यानंतर नामदेव महाराजांचे कार्य जगासमोर आणणे, हे आपले कर्तव्य असल्याची माहिती भावना आहे़ १० वर्षांपूर्वी माझ्या मनात या विचाराचे बीज रुजले गेले़ मी मूळचा थिएटरचा असल्याने त्यावर अगोदर नाटक करावे़ त्यानंतर आॅडिओ काढून त्याला कसे यश मिळते, हे पाहून चित्रपट काढावा, असा विचार होता़ त्यातच सुरुवातीची ५ वर्षे गेली़ आता जर आपण चित्रपट काढला नाही तर जीवनातील एक कार्य अपूर्ण राहले, अशी खंत वाटू लागल्याने त्यावर लक्ष केंद्रीत केले़ त्याचदरम्यान सिओ आॅर्गनायजेशनचे अध्यक्ष उत्तमराव मांढरे यांच्याशी भेट झाली आणि या चित्रपटाच्या कामाला गती मिळाली़ संत नामदेव यांच्यावरील वेगवेगळ्या भाषेतील पुस्तके जमा केली़ दोघा लेखकांकडून संहिता लिहून घेण्याचा प्रयत्न केला पण माझ्या मनामध्ये चित्रपटातून जो विचार मांडायचा होता़ तो त्यांच्याकडून प्रत्यक्षात लिखाणातून उतरत नसल्याचे दिसून आले़ शेवटी विकास कपूर यांना आम्हाला नेमके काय म्हणायचे आहे, ते उमगले़ त्यांच्याकडून चित्रपटाचे स्क्रिप्ट लिहून घेण्यात आले आहे़ यात माझा रोल हा क्रिएटिव्ह डायरेक्टर असणार असून येत्या काही दिवसांत चांगल्या दिग्दर्शकाची निवड करणार आहोत़ त्यानंतर संपूर्ण भारतभरातून कलाकारांची निवड केली जाईल़ त्यानंतर त्यांचे १० दिवसांचे वर्कशॉप घेऊन त्यांना संत नामदेव यांचे जीवनकार्य आणि चित्रपटातून आपल्याला नेमके काय सांगायचे आहे, हे त्यांच्यामध्ये बिंबविण्याचा प्रयत्न करणार आहोत़हा चित्रपट भव्य प्रमाणावर असणार असून त्याचे चित्रीकरण महाराष्ट्र, पंजाब, राजस्थान, मध्य प्रदेशमध्ये करण्यात येणार आहे़ सिओ आॅर्गनायझेशनचे राष्ट्रीय अध्यक्ष उत्तमराव मांढरे यांनी सांगितले, की हा संपूर्ण प्रकल्प लोकांच्या सहभागातून पूर्ण करण्यात येणार असून हिंदी, मराठी, कन्नड आणि पंजाबी भाषेत तो प्रदर्शित होईल़ यासाठी हॉलीवूड, बॉलीवूडमधील तंत्रज्ञांचे साह्य घेण्यात येणार आहे़ संत नामदेव हे एकमात्र असे संत आहेत ज्यांनी आपले संपूर्ण जीवन समाजासाठी व्यतित केले़ संपूर्ण भारतभर फिरून आपले अनुयायी तयार करून राष्ट्रीय एकात्मतेचा संदेश दिला़ त्यांच्या या कार्याची महती जगभर कळावी व असहिष्णुता कमी व्हावी, या उद्देशाने आम्ही हा चित्रपट तयार करीत आहोत़
संत नामदेव यांच्या जीवनकार्यावर चित्रपट
By admin | Published: June 09, 2017 12:45 AM