धरमपेठेतील घटना : कोळसा तस्करी, खंडणीचा वाद उफाळलानागपूर : कोळशाच्या तस्करी आणि खंडणीत गुंतलेल्या गुन्हेगारांनी आपल्याच एका साथीदारावर धावत्या कारमध्ये पिस्तुलातून गोळी झाडली. यामुळे तो गंभीर जखमी झाला. आज दुपारी १.२० ते १.२५ या वेळेत धरमपेठेतील सुदामा टॉकीजच्या मागे ही थरारक घटना घडली. सागिर अहमद सिद्दिकी (वय २८) असे गंभीर जखमीचे नाव आहे. त्याची प्रकृती चिंताजनक असून, या घटनेमुळे शहरात प्रचंड खळबळ निर्माण झाली आहे. सागिर हा मूळचा घुग्गुस (जि. चंद्रपूर) येथील रहिवासी असून, हाजी शेख सरवर या मोस्ट वॉन्टेड कोलमाफियाचा तो राईट हॅण्ड मानला जातो. सागिर गेल्या काही महिन्यांपासून नागपुरातूनच कोळसा तस्करी आणि खंडणीचे नेटवर्क नियंत्रित करतो. तो आपल्या साथीदारांसह आज दुपारी १२.३० च्या सुमारास धरमपेठेतील ‘गोकुळ’मध्ये नाश्ता घ्यायला आला. येथून नाश्ता घेतल्यानंतर आलिशान आॅडी कारमधून (एमएच ४०/ एसी ९७९७) ते सुदामा चित्रपटगृहाच्या मागून निघाले. कार सागिरच चालवत होता. कार सुरू करताच कुण्या एका मुद्यावरून त्यांच्यात वाद झाला अन् तो विकोपाला पोहचला. त्यामुळे सागिरच्या साथीदाराने पिस्तूलची नळी ड्रायव्हिंग सीटच्या वरच्या (मागच्या बाजूला) ठेवून गोळी झाडली. त्यामुळे सीटच्या वरची सीट भेदून गोळी सागिरच्या कानाजवळ लागली. मुख्यमंत्र्यांचे निवासस्थान अन् अफवासोशल नेटवर्किंगच्या माध्यमातून मुख्यमंत्र्यांच्या घराजवळ फायरिंगची घटना घडल्याची अफवा पसरल्याने शहरात जोरदार खळबळ निर्माण झाली होती. प्रत्यक्षात घटनास्थळ आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निवासस्थानाचे अंतर ५०० मीटर आहे. सागीरचा गेम करणाऱ्या तिघांना पोलिसांनी ताब्यात घेतले. शक्ती मनपिया, जाकीर आणि आशिष अशी या तिघांची नावे आहेत. यातील शक्तीने गोळी झाडल्याचे पोलीस सांगतात. ती रक्कम कुठाय? कोळसा आणि ट्रान्सपोर्ट यातून सागीर रोज ५ ते १० लाख रुपयांची उलाढाल करतात. सागीरजवळ २४ तास किमान ५ ते १० लाखांची रोकड असते; शिवाय त्याच्या अंगावर एक किलो सोन्याचे दागिनेसुद्धा असतात. आजही सागीरजवळ मोठी रोकड अन् दागिने होते. सूत्रांच्या माहितीनुसार, ही रोकड अन् दागिने सागीरसोबतच्या तिघांनी लगेच आपल्या खिशात कोंबली. त्यानंतरच सागीरला वॅगनआरमध्ये बसवले. ही रक्कम अन् लाखोंचे दागिने आरोपींनी कुठे ठेवले, त्याचा आता शोध घेतला जात आहे. (प्रतिनिधी)
धावत्या कारमध्ये तरुणावर गोळी झाडली
By admin | Published: December 03, 2014 12:43 AM