मुंबई - राज्यातील पूरपरिस्थितीमुळे स्थगित करण्यात आलेली राष्ट्रवादी काँग्रेसची ‘शिवस्वराज्य यात्रा’ पुन्हा सुरु करण्यात आली आहे. राष्ट्रवादीचे खासदार अमोल कोल्हे या यात्रेतून भाजप-शिवसेनेवर टीका करताना पाहायला मिळत आहे. गुरुवारी जिंतूर येथील सभेत त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार टीका केली. राज्याची उपराजधानी आणि मुख्यमंत्र्यांचे शहर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नागपुरात चार दिवसात एक खून आणि दोन दिवसात एक बलात्काराची घटना घडत आहे. त्यामुळे आता फडणवीस यांनी सांगावे की, कुठे नेऊन ठेवलाय महाराष्ट्र माझा. असा टोला खासदार कोल्हे यांनी मुख्यमंत्र्यांना लगावला.
२०१४ च्या निवडणुकीत भाजपने केलेली ‘कुठे नेऊन ठेवलाय महाराष्ट्र माझा’ ही जाहिरात चांगलीच गाजली होती. आघाडी सरकारच्या कारभारावर या जाहिरातीतून कोरडे ओढण्यात आले होते. यावरूनच आता खासदार अमोल कोल्हे यांनी भाजपवर हल्लाबोल केला आहे. मुख्यमंत्र्यांचे शहर म्हणून ओळख असलेल्या नागपुरात चार दिवसाला एक खून, दोन दिवसात एक बलात्कार आणि दररोज एक अपहरणाची घटना घडत आहे. नागपूर आता गुन्हेगारींची राजधानी बनली आहे. त्यामुळे आता फडणवीस यांनी सांगावा की, कुठे नेऊन ठेवलाय महाराष्ट्र माझा अशा शब्दात खासदार कोल्हेंनी भाजप सराकरवर शरसंधान साधले.
एकीकडे मुख्यमंत्री सांगतात शेतकरी कर्जमाफी करणार, तर दुसरीकडे राज्याचे अर्थमंत्री म्हणतात कर्जमाफी करणे शक्य नाही. रांगेत उभे राहून पाये दुखले पण अजूनही शेतकऱ्यांच्या हातात ही कर्जमाफी आली नसल्याचा आरोप कोल्हे यांनी यावेळी केला. पीक विम्याच्या नावाने १६ ह्जार कोटींचा निव्वळ नफा खाजगी कंपनांच्या घशात घालण्यात आल्याचा दावा सुद्धा कोल्हे यांनी केला आहे.