शिबिर हे लढण्याचे शिबिर आहे. ही रुदाली नाही. का झालं कशामुळे झालं? हे सांगण्याचे हे शिबिर नाही. ३५० वर्षांपूर्वीच्या महाराष्ट्राचा इतिहास हा छत्रपती शिवाजी महाराजांशिवाय पूर्ण होत नाही. ३५० वर्षांपूर्वीच्या इतिहासात जेव्हा आपण डोकावतो तेव्हा आदिलशाही, मुघलशाही, निजामशाही होती. भले-मोठे मोठे सरदार, पराक्रमी, वतनदार होते, तलवारीला प्रत्येकाच्या धार होती. मनगटात प्रत्येकाची ताकद होती, पण माना मात्र मुघलशाही, आदिलशाहीसमोर झोपलेल्या होत्या कारण प्रत्येकाला आपली वतने वाचवायची होती, असं खासदार अमोल कोल्हे यांनी सांगितले.
वेदांता, फॉक्सकॉन, डायमंड बोस, पाणबुडी, महानंदा हे प्रकल्प गेलेत; कांद्याची निर्यात बंदी झाली. मात्र आमच्या ताटातलं का हीसाकाऊन घेत आहात? असं महाराष्ट्रातल्या एकाही नेत्याला मान वर करून केंद्राला विचारण्याची हिंमत झाली नाही. लाचारीने मान जर झुकवली तर नजरेला नजर देण्याची हिंमत उरत नाही, अशी टीका अमोल कोल्हेंनी यावेळी केली. महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शिर्डी येथे शिबिर होत आहे. आज या शिबिराचा दुसरा दिवस असून खासदार अमोल कोल्हे यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले.
माध्यमांमधून आपण ऐकत असतो कोणीतरी हिंदुत्वासाठी, कुणीतरी विकासासाठी; प्रत्येकाचा आपापला वर्जन हा ठरलेला असतो आणि त्याचा आपण आदरही करू, पण महाराष्ट्रात जे उदाहरण आहे ते महाराष्ट्रातल्या तरुणांनी आधी लक्षात ठेवले पाहिजे. जेव्हा छत्रपती शिवाजी महाराज आग्र्याला औरंगजेबाच्या दरबारात उभे होते तेव्हा औरंगजेबाच्या मनात होते छत्रपती शिवाजी महाराजांनी जर मांडलिकत्व पत्करलं, तर शिवाजी महाराजांना आपण दख्खनची सुभेदारी देऊ; हा दख्खनचा जो सुबा होता हा दख्खनचा सुबा छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्यापेक्षा अडीच ते तीन पट होता, कितीतरी पटीने ऐश्वर्या संपन्न होता. कितीतरी पटीने आकाराने मोठा होता, संघर्षाची गरज नव्हती, मुघलांची तलवार मानेवर येणार नव्हती, ऐशो आरामाचे, सुखाचे जीवन होते, छत्रपती शिवाजी महाराजांनी मांडलिकत्व पत्करले नाही त्यांनी तत्त्वांसाठी लढणे पत्करलं आणि म्हणूनच साडेतीनशे वर्षानंतर आपण नाव घेतो ते छत्रपती शिवाजी महाराजांचे आणि त्या वाटेने आपण आता चाललेलो आहोत, असं अमोल कोल्हे म्हणाले.