Bajrang Sonwane : बीडचे नवनिर्वाचित खासदार बजरंग सोनवणे हे अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करणार असल्याचा दावा आमदार अमोल मिटकरी यांनी केला होता.अमोल मिटकरी यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे खासदार बजरंग सोनवणे यांच्याबाबत केलेल्या दाव्यानंतर राजकीय वर्तुळात चर्चा सुरु झाली. बीडच्या बप्पाचा दादांना फोन अशी पोस्ट अमोल मिटकरी यांनी केली होती. अमोल मिटकरी यांच्या दाव्यानंतर चर्चांना उधाण आलं होतं. यावर आता बजरंग सोनवणे यांनी स्पष्टीकरण दिलं आहे. अमोल मिटकरी हे अजित पवारांच्या बंगल्यावरील फोन ऑपरेटर आहेत का? असा टोला बजरंग सोनवणे यांनी लगावला आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे प्रवक्ते आमदार अमोल मिटकरी यांनी ट्वीट करत खासदार बजरंग सोनवणे यांच्याबाबत धक्कादायक दावा केला होता. बीडच्या बप्पाचा दादांना फोन असे ट्वीट अमोल मिटकरींनी केली. त्यानंतर बजरंग सोनवणे हे अजित पवारांच्या संपर्कात आहेत का? अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरु झाली. त्यानंतर मी जिवंत असेपर्यंत मी शरद पवार यांच्यासोबतच राहणार, असे स्पष्टीकरण सोनवणे यांनी दिले होतं. मात्र आता अमोल मिटकरी हे फोन ऑपरेटर आहेत का असा खोचक सवाल सोनवणे यांनी केलाय.
“अमोल मिटकरी कोण आहेत? अजित पवारांच्या बंगल्यावरील ऑपरेटर आहेत का? अमोल मिटकरी कोण आहेत हेच मला माहिती नाही. अजित पवारांच्या बंगल्यावर ऑपरेटर म्हणून एखादे अमोल मिटकरी असतील. त्यामुळे अजित पवारांना दिवसभरात किती आणि कोणाचे फोन येतात, याचे रेकॉर्ड त्यांच्याकडे असेल. मात्र, अमोल मिटकरी कोण आहेत हे पहिल्यांदा महाराष्ट्राला कळलं पाहिजे, असं बजरंग सोनवणे यांनी म्हटलं.
"अमोल मिटकरी ट्वीट करतील आणि त्याची दखल घ्यावी लागेल असे दिग्गज नाही. ते दखल घेण्यासारख्या लोकांमध्ये येत नाहीत. अमोल मिटकरी यांनी मी कुणाच्या तरी संपर्कात असल्याचे सांगितले. शरद पवार यांचे आठ खासदार निवडूण आले आहेत. एखादा खासदार माझ्यासारखा कुणाच्या संपर्कात गेला तर त्याला जनता मारेलच. पण माझ्या घरात माझे वडील मला मारतील आणि माझी बायको तुम्हाला खायलाही मिळणार नाही, नाश्तादेखील नाही, असे म्हणेल. ज्यांचा एक खासदार आहे त्यांना आमच्या संपर्कात येता येईल," असा टोला बजरंग सोनवणे यांनी लगावला.