गेल्या काही दिवसांपासून हर हर महादेव या चित्रपटावरून वाद सुरू आहे. यापूर्वी माजी खासदार छत्रपती संभाजीराजे यांनी पत्रकार परिषद घेऊन या चित्रपटाला विरोध केला होता. त्यानंतर राज्यात अनेक ठिकाणी या चित्रपटाचे शो बंद पाडण्यात आले होते. तर दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांनीदेखील आक्रमक भूमिका घेतली होती. दरम्यान, आता हा चित्रपट १८ डिसेंबर रोजी झी मराठी या वाहिनीवर प्रदर्शित होणार आहे. यावरून आता पुन्हा एकदा छत्रपती संभाजीराजे यांनी वाहिनीला इशारा दिला आहे.
“हर हर महादेव हा चित्रपट थिएटर मध्ये बंद पडल्यानंतर आता १८ डिसेंबर रोजी झी मराठी या वाहिनीवरून टीव्हीवर प्रदर्शित केला जाणार आहे. हर हर महादेव हा वादग्रस्त चित्रपट टीव्हीवर प्रदर्शित केल्यास होणाऱ्या गंभीर परिणामांना झी स्टुडिओ जबाबदार असेल,” असं ट्वीट संभाजीराजे यांनी केलं आहे. यासोबत त्यांनी झी ला पाठवलेलं पत्रही जोडलं आहे.
“इतिहासाचे चुकीच्या पद्धतीने सादरीकरण करण्यात आलेला व तमाम शिवभक्तांच्या भावना दुखावणारा हा चित्रपट टिवीहीवर प्रदर्शित करू नये, याबाबत #स्वराज्य संघटनेने झी स्टुडीओला पत्र लिहून सूचित केले आहे. या सूचनेकडे कानाडोळा करून हर हर महादेव चित्रपट टिव्हीवर प्रदर्शित केल्यास होणाऱ्या गंभीर परिणामांना झी स्टुडिओ जबाबदार असेल,” असंही त्यांनी नमूद केलंय.