मनोहर कुंभेजकर, लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई: उत्तर पश्चिम मुंबई लोकसभा मतदार संघाचे खासदार व शिवसेना नेते गजानन कीर्तिकर यांनी आमदार,मंत्री,खासदार अशी पदे भूषवतांना शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या आदेशांचे तंतोतंत पालन त्यांनी केले. वेळप्रसंगी एसटी, मिळेल त्या वाहनांनी प्रवास करत त्यांनी संघटना वाढवली.अनंत अडचणी अडथळे पार करून त्यांनी मनाचा निश्चय करत आमच्या बाळासाहेबांच्या शिवसेनेत प्रवेश केला.तुम्ही मुख्यमंत्री मंत्री म्हणून जनतेची सेवा करा, राज्याचा विकास करा, मी सर्वांना एकत्र घेऊन संघटना वाढवतो असे मला सांगितले.त्यामुळे खासदार गजानन कीर्तिकर यांच्या कुशल संघटक कौशल्याचा आमच्या पक्षाला निश्चित फायदा होईल असा ठाम विश्वास राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काल रात्री मालाड येथे केला.
महाराष्ट्र हौसींग बोर्ड कॉलनी, दिंडोशी, ओबेरॉय मॉल समोर,मालाड (पूर्व) याठिकाणी खासदार गजानन कीर्तिकर यांच्या खासदार स्थानिक विकास कार्यक्रम निधीतून सुसज्ज योगालय व बाल संस्कार केंद्र उभारण्यात आले आहे. कलावती आईंच्या साधकांना योगसाधना व बालसंगोपना करण्यासाठी श्री सिद्धकला विश्वस्त मंडळ गोरेगाव यांना सदर योगालय हस्तांतरीत केले असून मुंबई शहरातील हजारो साधकांना या वास्तुचा लाभ होणार आहे. सदर वास्तुचा लोकार्पण सोहळा काल रात्री मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते संपन्न झाला,त्यावेळी ते बोलत होते.
खासदार गजानन कीर्तिकर यांनी बाळासाहेबांच्या शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर प्रथमच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघात आगमन झाल्यामुळे त्यांचे गुलाबांच्या फुलांचा मोठा हार,शाल आणि चांदीची तलवार देवून खासदार कीर्तिकर यांनी त्यांचे जंगी स्वागत केले. या प्रसंगी शिवसेना नेते व माजी मंत्री रामदास कदम, शिवसेना नेते व माजी खासदार आनंदराव अडसुळ, मागाठाणेचे आमदार व विभागप्रमुख प्रकाश सुर्वे, माजी आमदार अनिल तटकरे, शिवसेना उपनेत्या शितल म्हात्रे आणि इतर मान्यवर उपस्थित होते.तर यावेळी प्रभाग क्रमांक ४१ चे माजी नगरसेवक सदाशिव पाटील,प्रभाग क्रमांक ३८ चे नगरसेवक आत्माराम चाचे आणि गोरेगाव पश्चिम युवा सेनेचे पदाधिकारी सनी दहिहंडे यांनी मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत बाळासाहेबांच्या शिवसेनेत प्रवेश केला.
मुख्यमंत्री पुढे म्हणाले की,खासदार गजानन कीर्तिकर यांनी बाळासाहेबांच्या शिवसेनेत प्रवेश केल्याने येथील वातावरण बदलले आहे.त्यांनी दुरदृष्टी ठेवून योगसाधना व बालसंगोपन केंद्र उभारण्यासाठी खासदार निधी कमी पडला म्हणून स्वतःचे पैसे दिले. अश्या प्रकारच्या केंद्रातून मनाच्या आणि व्यक्तिमत्वाचा विकास होतो,सात्विकता,दुसऱ्याला मदत करण्याची भावना निर्माण होते.बालवयात आध्यत्म मार्ग स्वीकारून चांगले संस्कार घडतात.योगासारखी जीवनशैली महत्वाची ठरते.त्यामुळे चेतना देणारे,ऊर्जा देणारे सदर केंद्र ठरेल.या केंद्रातून निरोगी पिढी निर्माण होवून हे केंद्र समाजभिमुख काम करेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
खासदार गजानन कीर्तिकर आपल्या प्रास्ताविक भाषणात म्हणाले की,५६ वर्षाच्या राजकीय कारकिर्दीत ४५ वर्षे बाळासाहेबां बरोबर काम केले.चारवेळा आमदार,मंत्री,दोन वेळा खासदार,मराठी माणसांना नोकरी मिळावी म्हणून लोकाधिकार समितीत काम करण्याची संधी बाळासाहेबांनी मला दिली. मात्र उद्धव ठाकरे यांच्या ११ वर्षांच्या कारकिर्दीत माझ्या पेक्षा कमी अनुभवी जुनियरला केंद्रात मंत्रीपद आणि लोकसभेत शिवसेनेचे गटनेते पद देवून माझ्या सारख्या निष्ठावंताला बाजूला केले अशी आपली खदखद त्यांनी व्यक्त केली.
शिवसेना चुकीच्या मार्गाने जात होती,शिवसेनेची आक्रमकता कमी झाली होती,बाळासाहेबांचे विचार दडपले जात होते.राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आणि काँग्रेस बरोबर शिवसेना प्रवास करत होती,आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शिवसेना संपवायला निघाली होती.त्यामुळे ४० आमदारांनी उठाव केला.हिंदुत्वाचा मुद्दा संपत चालला होता,ज्या राहुल गांधींनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा अपमान केला त्यांच्या भारत जोडो यात्रेत आदित्य ठाकरे सहभागी होवून त्यांची गळाभेट त्यांनी घेतली.त्यामुळे पक्षात माझी घुसमट होत असल्याने अखेर मी मनाचा निश्चय करत दि,११ नोव्हेंबरला बाळासाहेबांच्या शिवसेनेत प्रवेश केल्याचा घटनाक्रम त्यांनी विषद केला.
मी उत्तर पश्चिम लोकसभा मतदार संघात नवीन टीम उभी केली असून आगामी पालिका निवडणुकीत २० नगरसेवक, आमदारकीच्या निवडणूकीत ३ आमदार आणि लोकसभा निवडणूकीत आमच्या पक्षाचा उमेदवार निवडून येईल. मुंबईचा महापौर आमचा असेल आणि पंतप्रधान म्हणून नरेंद्र मोदी पुन्हा विराजमान होतील असा ठाम विश्वास खासदार कीर्तिकर यांनी व्यक्त केला.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रसिद्ध निवेदिका शिबानी जोशी यांनी केले.