मुंबई - विधानसभा निवडणुकीला काही दिवसांचा काळ शिल्लक राहिला असताना, वंचित बहुजन आघाडी आणि एमआयएम यांच्यात युती होणार नसल्याचा खुलासा खासदार इम्तियाज जलील यांनी प्रसिध्द पत्रक काढून केला आहे. मात्र हा निर्णय जलील यांचा असून, जोपर्यंत एमआयएम प्रमुख असदुद्दीन ओवेसी सांगत नाहीत तोपर्यंत युती कायम असल्याचा दावा वंचित बहुजन आघाडीकडून करण्यात आला आहे. तर वंचित सोबत युती तोडल्याचा आरोप जलील यांच्यावर होत असताना असदुद्दीन ओवेसी यांनी मौन बाळगले असल्याने जलील एकाकी पडले असल्याचे दिसत आहे.
वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांच्याकडून सन्मानपूर्वक वागणूक मिळाली नाही. त्यांनी फक्त आठ जागांची ऑफर दिली, जी कोणत्याही परिस्थितीत मान्य नाही. त्यामुळे बाहेर पडण्याचा निर्णय घेत आहोत, असं जलील यांनी जाहीर केले होते. तर खासदार झाल्यामुळे जलील यांची राजकीय महत्वाकांक्षा वाढली असल्याचा आरोप वंचित बहुजन आघाडीचे प्रवक्ते सचिन माळी यानी केला होता. त्याचबरोबर युती तोडण्याचा निर्णय जलील यांचा असल्याचा आरोप सुद्धा वंचित बहुजन आघाडीकडून करण्यात आला होता.
तर ओवेसी यांना न विचारता जलील यांनी युती तोडल्याचे आरोप होत असताना, जलील यांनी हे आरोप फेटाळून लावली आहेत. मला पक्षाचे प्रमुख ओवेसी यांनी दिलेल्या आदेशानुसार मी प्रसिद्धी पत्रक जाहीर केले असल्याचा दावा त्यांनी केला आहे. मात्र जलील यांच्यावर युती तोडण्याचे आरोप होत असताना एमआयएमचे अध्यक्ष असदुद्दीन ओवेसी यांनी कोणतेही प्रतिकिया दिली नसल्याने, त्यांच्या मौनाने खासदार जलील हे एकाकी पडले असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात पाहायला मिळत आहे.
एमआयएमने वंचित बहुजन आघाडीकडे ९८ जागांचा प्रस्ताव दिला असल्याचे बोलले जाता असताना, वंचितकडून हा दावा फेटाळून लावण्यात आला आहे. एमआयएमने फक्त १७ जागा मागितल्याचा खुलासा वंचितकडून करण्यात आला आहे. मात्र जलील यांच्या युती तोडण्याच्या घोषणेनंतर अनेक घडमोडी घडत असताना असदुद्दीन ओवेसी यांची कोणतेही प्रतिकिया यावर आली नाही. त्यामुळे ओवेसी यांची नेमकी काय भूमिका असणार आहे, हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.