कल्याण: राज्यसभा निवडणूक निकालानंतर महाविकास आघाडीतील मंत्री विजय वडेट्टिवार यांनी अपक्ष आमदारांना निधी देताना विचार करू हे केलेले वक्तव्य भाजपच्या हिताचे असून याचा फायदा विधानपरिषदेच्या निवडणूकीत होईल असे प्रतिपादन केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांनी केले.
येथील निर्भय जर्नलिस्ट फाउंडेशन तर्फे रविवारी पाटील यांचा वार्तालाप होता. स्थानिक मुद्यांवर बोलताना पाटील यांनी राज्यसभा निवडणुकीसंदर्भात वडेट्टीवारांसह संजय राऊत यांनीही केलेल्या वक्तव्यावर भाष्य केले. वडेट्टिवार यांच्या वक्तव्याबाबत बोलताना पाटील म्हणाले, “राज्यसभा निवडणुकीत जी काही मत भाजपच्या पारड्यात पडली ती महाविकास आघाडी सरकारमधील नाराज आमदारांची होती. निवडणुकीनंतर अपक्ष आमदारांच्या निधीबाबत भाष्य करून वडेट्टिवारांनी एकप्रकारे येऊ घातलेल्या विधानपरिषद निवडणुकीत भाजपला पाच उमेदवार निवडून आणण्यासाठी पोषक वातावरण निर्माण केले आहे.” “अपक्ष आमदार त्यांच्या वक्तव्याचा विचार करतील आणि भाजपला मतदान करतील याकडे पाटील यांनी लक्ष वेधले. जुलै महिन्यात होणाऱ्या राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीसाठी मोर्चेबांधणी करण्यासाठी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी देशातील २२ विरोधी पक्ष नेत्यांना पत्र पाठवून बैठकीसाठी बोलावले आहे. त्यावर बोलताना पाटील यांनी भाजपचा उमेदवार १०० टक्के निवडून येणार असा दावा केला.
ईडीचा संबंध आला कुठून?“राज्यसभेच्या निवडणुकीत भाजपचा झालेला विजय हा देवेंद्र फडणवीसांच्या रणनितीचा आहे. संजय राऊत यांना रणनिती आणि निवडणूक लढविण्याचा अनुभव आहे की नाही याचा विचार करण्याची गरज आहे. काही झालं तरी ते केंद्राकडे बोट दाखवितात आणि ईडीशी संबंध जोडतात. राज्यसभेच्या निवडणुकीत ईडीचा संबंध आला कुठून, त्यांच्या दोन आमदारांना हायकोर्टानेही मतदानाचा हक्क नाकारला. हायकोर्टसुध्दा ईडीच्या सांगण्यावरून चालते का?,” असा सवाल पाटील यांनी केला.
दिबांच्या नावासाठी दबाव वाढविणारनवी दिल्ली येथे अखिल भारतीय लवणकार (आगरी) समाजाचे राष्ट्रीय संमेलन सोमवारी होणार आहे. यात नवी मुंबईतील नियोजित आंतरराष्ट्रीय विमानतळाला आगरी समाजातील दिवंगत नेते दि.बा.पाटील यांचे नाव देण्याबाबत जो आग्रह समाजाकडून धरला जात आहे, त्यावर चर्चा करून दिबांचे नाव देण्यासाठी महाराष्ट्र सरकारवर दबाव वाढविण्याबाबत निर्णय घेतला जाणार असल्याचे पाटील यांनी सांगितले.