लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : महाराष्ट्रातील राजकीय वर्तुळात कोरोनाचा उद्रेक पाहायला मिळत आहे. सहा ज्येष्ठ मंत्र्यांसह खासदार आणि आमदार मोठ्या प्रमाणावर कोरोनाबाधित झाले आहेत.
मोठ्या प्रमाणावर मंत्री आणि लोकप्रतिनिधी कोरोनाच्या विळख्यात सापडल्याने बुधवारी होणारी राज्य मंत्रिमंडळाची साप्ताहिक बैठक रद्द करण्यात आली आहे. दर बुधवारी किंवा गुरुवारी मंत्रिमंडळाची बैठक होते. कोरोनाची साथ आल्यापासून मंत्रिमंडळ बैठकीचे ठिकाण मंत्रालयाऐवजी सह्याद्री अतिथिगृह करण्यात आले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे या बैठकांना ऑनलाइन पद्धतीने उपस्थिती लावत असत. या आठवड्याची मंत्रिमंडळ बैठक आज, बुधवारी आयोजित करण्याचे नियोजन होते, मात्र मंत्रिमंडळातील अनेक सदस्यांना करोनाची बाधा झाली आहे. त्यामुळे मंत्रिमंडळ बैठक रद्द करण्यात आल्याचा निरोप दुपारीच मंत्र्यांच्या खासगी सचिवांना देण्यात आला.
मंत्रिमंडळ बैठकीच्या दिवशी बहुतांश आमदार आणि राजकीय कार्यकर्ते आपली कामे घेऊन मंत्र्यांना भेटण्यासाठी मंत्रालयात येत असतात. आपली कामे घेऊन येणाऱ्या नागरिकांची मोठी गर्दी असते. त्यामुळे खबरदारी म्हणून मंत्रिमंडळ बैठक रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. आतापर्यंत महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे, शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड, महिला व बाल कल्याण मंत्री यशोमती ठाकूर, आदिवासी विकास मंत्री के. सी. पाडवी, आणि राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे आदींना करोना संसर्ग झाला आहे. शिवसेनेचे खासदार अरविंद सावंत, राजन विचारे आमदारांमध्ये भाजपचे सागर मेघे, राधाकृष्ण विखे पाटील, शेखर निकम, इंद्रनील नाईक, चंद्रकांत पाटील, माधुरी मिसाळ, रोहित पवार, प्रताप सरनाईक आदी आमदारांना कोरोनाची बाधा झाली आहे. दरम्यान राज्य मंत्रिमंडळातील १३ मंत्री, तर राज्यभरातील तब्बल ७० आमदारांना कोरोनाचा संसर्ग झाल्याची माहिती राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी दिली आहे.
डॉ. तात्याराव लहाने पाॅझिटिव्हज्येष्ठ नेत्रतज्ज्ञ डॉ. तात्याराव लहाने यांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यांना कोरोनाची सौम्य लक्षणे असून, उपचार सुरू असल्याची माहिती डॉ. लहाने यांनी दिली. त्यांची प्रकृती स्थिर आहे.
संपर्कात आलेल्यांना आवाहनएकनाथ शिंदे यांनी आपली प्रकृती उत्तम असल्याचे सांगितले. आपल्या संपर्कात आलेल्यांनी स्वत:ची चाचणी करून घ्यावी व उपचार करावे, असा सल्ला त्यांनी दिला. आपली प्रकृती उत्तम असल्याचे त्यांनी सांगितले. आपल्या संपर्कात आलेल्यांनी स्वत:ची चाचणी करून घ्यावी व उपचार करावे, असा सल्ला त्यांनी दिला. शिंदे यांनी सोमवारी विद्यार्थ्यांच्या लसीकरण कार्यक्रमाला हजेरी लावली होती.