Naresh Mhaske on Shrikant Shinde : महाराष्ट्रात महायुतीला प्रचंड बहुमत मिळालं असलं तरी मुख्यमंत्री कोण होणार? याचा पेच संपलेला नाही. भाजपचा मुख्यमंत्री होणार असल्याचे निश्चित असून देवेंद्र फडणवीस यांना संधी मिळणार असल्याचे जवळपास निश्चित झालेलं आहे. मात्र याबाबत अधिकृत घोषणा झालेली नाही. दुसरीकडे, एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वात महायुतीला प्रचंड यश मिळाल्याने त्यांना मुख्यमंत्री करावं अशी मागणी शिवसेनेच्या नेत्यांनी केली होती. मात्र एकनाथ शिंदे यांनी पत्रकार परिषद त्यांची भूमिका स्पष्ट केली होती. त्यानंतर श्रीकांत शिंदेंना उपमुख्यमंत्री केलं जाऊ शकतं अशी चर्चा सुरु झाली होती. मात्र आता शिवसेना शिंदे गटाकडून याबाबत स्पष्टीकरण देण्यात आलं आहे.
शिवसेना खासदार श्रीकांत शिंदे यांना उपमुख्यमंत्रिपदी विराजमान केले जाण्याच्या चर्चांना उधाण आलं होतं. मात्र आता खासदार नरेश म्हस्के यांनी याबाबत स्पष्टीकरण दिलं आहे. खासदार श्रीकांत शिंदे यांच्यासाठी कोणतंही पद मागितलेलं नाही अशी माहिती खासदार नरेश म्हस्के यांनी दिली आहे. श्रीकांत शिंदे यांच्या संदर्भात पक्षामध्ये कोणतीही चर्चा नसल्याचे नरेश म्हस्के यांनी स्पष्ट केलं. श्रीकांत शिंदे हे केंद्रातही मंत्रीपद घेऊ शकले असते मात्र त्यांनी ते घेतलं नाही, असंही नरेश म्हस्के यांनी म्हटलं.
श्रीकांत शिंदे हे उपमुख्यमंत्री होणार असल्याच्या चर्चावर नरेश म्हस्के यांनी भाष्य केलं आहे. "श्रीकांत शिंदे हे तिसऱ्यांदा खासदार झाले आहेत. ते तिसऱ्यांदा प्रचंड बहुमताने खासदार म्हणून निवडून आले आहेत. त्यांच्या आणि उपमुख्यमंत्रीपदाचा संबंध नाही. कुठल्याही पद्धतीने श्रीकांत शिंदे यांच्याकरता उपमुख्यमंत्रीपद आम्ही मागितलेलं नाही. काल एकनाथ शिंदे यांनीही ते जाहीर केलं. पण आदित्य ठाकरे आणि श्रीकांत शिंदे यांच्यात तुलना करत असाल तर श्रीकांत शिंदे हे तिसऱ्यांदा खासदार झाले आहेत. ते केंद्रात मंत्रीपद घेऊ शकले असते. परंतु पक्षातील वरिष्ठ खासदाराला त्यांनी मंत्रीपद दिलं आहे. त्यामुळे त्यांची आणि आदित्य ठाकरे यांची तुलना होऊ शकत नाही," असं नरेश म्हस्के यांनी स्पष्ट केलं.
एकनाथ शिंदेंनीही केलं भाष्य
"या चर्चा अजून सुरु आहेत. तुम्ही चर्चा करत असता. तुमच्या चर्चा खूप जास्त असतात. त्यामुळे या चर्चा आहेत. एक बैठक अमित शाह यांच्याशी झाली आहे. आता तिघांची एक बैठक होईल आणि त्यात साधक बाधक चर्चा होईल आणि त्यातून महाराष्ट्राच्या हिताचा योग्य तो निर्णय घेतला जाईल. जनतेने आम्हाला भरभरुन दिलं आहे. आम्ही सत्ता दिली, बहुमत दिलं असं असताना जनतेचं चांगलं सरकार स्थापन व्हावी अशी अपेक्षा असेल. आणि आम्ही जनतेला उत्तरदायित्व आहोत, विरोधकांना नाही. विरोधकांकडे आता काय काम राहिलं आहे. आमच्यात समन्वयाचा अभाव नाही. मी एकदा भूमिका स्पष्ट केल्यानंतर वारंवार करण्याची गरज नाही," असं स्पष्टीकरण मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी दिलं.