अमरावती – राज्यात कोरोनाचा कहर दिवसेंदिवस वाढत असताना राजकीय नेतेही याचा कोरोनाच्या विळख्यात अडकल्याचं दिसून आलं आहे. अमरावतीच्या खासदार नवनीत कौर राणा यांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आल्याची बातमी आहे. त्यांच्या घरातील ११ सदस्यांना कोरोनाची लागण झाली आहे. यात नवनीत राणा यांच्या दोन्ही मुलांचा आणि सासू-सासऱ्यांचाही समावेश आहे.
४ दिवसांपूर्वी आमदार रवी राणा व खासदार नवनीत राणा यांची ७ वर्षीय मुलगी आणि ४ वर्षीय मुलासह कुटुंबातील इतर सदस्य कोरोनाग्रस्त झाले होते. आमदार रवी राणा हे आई -वडिलांना घेऊन नागपूर येथे होते, खासदार नवनीत राणा या मुलामुलींची काळजी घेण्यासाठी घरीच होत्या. नवनीत राणा यांना अस्वस्थ वाटत असल्यामुळे त्यांची टेस्ट करण्यात आली होती.रॅपिड अँटिजिन टेस्ट व थ्रोट स्वाब घेण्यात आले. रॅपिड टेस्ट मध्ये खासदार नवनीत राणा यांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे.
खासदारांच्या संपर्कात आलेल्यांची सुद्धा टेस्ट करण्यात आली आहे. सर्वांनी दक्षता घ्यावी-सुरक्षित राहावे असे आवाहन खासदार नवनीत राणा व आमदार रवी राणा यांचे वतीने करण्यात येत आहे. आमदार रवी राणा यांचे वडील गंगाधर राणा यांचा कोरोना रिपोर्ट २ ऑगस्ट रोजी पॉझिटिव्ह आला होता. त्यानंतर राणा दाम्प्त्य आणि त्यांची मुले, इतर कुटुंबातील सदस्यांची कोरोना चाचणी करण्यात आली होती.