कोल्हापूर : सरकार माझ्यावर पाळत ठेवत आहे, असे ट्वीट खासदार संभाजीराजे यांनी केल्याने सोमवारी सायंकाळनंतर राज्याच्या राजकारणात खळबळ उडाली. परंतु सायंकाळी सहा वाजता केलेले ट्वीट त्यांनी रात्री साडेआठ वाजता मागे घेतले. गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांचा फोन आला, त्यांनी दिलेल्या माहितीमुळे माझे समाधान झाले, विषय संपला... असे पुन्हा ट्वीट करून त्यांनी या विषयावर पडदा टाकला खरा, परंतु आधीच्या ट्वीटमुळे सोशल मीडियावर राज्य सरकारविरोधात संतप्त प्रतिक्रिया उमटल्या.मराठा आरक्षणासह समाजाच्या विविध मागण्यांसाठी खासदार संभाजीराजे यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. संभाजीराजे सोमवारी सिंधुदुर्ग दौऱ्यावर होते. सायंकाळी सहाच्या सुमारास त्यांनी सरकार माझ्यावर पाळत ठेवत आहे. माझी हेरगिरी करण्याचा नेमका उद्देश माहीत नाही. पण, मला हेच लक्षात येत नाहीये की, माझ्यासारख्या सरळ आणि प्रामाणिकपणे काम करणाऱ्या एका कार्यकर्त्यावर हेरगिरी करून काय साध्य होणार आहे? असे ट्वीट केले. त्यात त्यांनी राज्य सरकार की केंद्र सरकार पाळत ठेवत आहे, याबद्दल स्पष्ट केलेेले नव्हते.
हेरगिरीचे ट्वीट संभाजीराजेंकडून मागे; गृहमंत्र्यांच्या फोनवर झाले समाधान
By ऑनलाइन लोकमत | Published: June 01, 2021 7:12 AM