सारथी संस्थेसाठी मराठा समाजाने पुन्हा एकत्र येण्याची गरज आहे व सारथी संस्थेच्या बाबत संबंधित मंत्र्यांनी दुटप्पी भूमिका सोडून द्यावी अशी समाजाची भावना असल्याचं खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी म्हटलं आहे. सारथीच्या स्वायत्ततेसाठी आणि मराठा समाजातील भावी पिढीच्या कल्याणासाठी मराठा समाजाने पुन्हा एकदा एकत्र येण्याचे आवाहन संभाजीराजे यांनी केलं. यानंतर आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिलेला शब्द पाळला नाही असं म्हणत संभाजीराजेंनी आपला संताप व्यक्त केला आहे.
'मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सारथी या संस्थेबाबत दिलेला शब्द पाळला नाही. तसेच मराठा समाजाची एकही मागणी पूर्ण केली नाही' असा आरोप संभाजीराजे यांनी केला आहे. या संस्थेबाबत सुरू असलेला पोरखेळ चालू देणार नाही असा इशाराही त्यांनी यावेळी दिला. "11 जानेवारीला आम्ही पुण्यात राजर्षी शाहू महाराजांच्या नावाने स्थापन झालेल्या सारथी या संस्थेच्या विविध मागण्यांसाठी आंदोलन केले. नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी आंदोलनस्थळी येऊन सर्व मागण्या पूर्ण करण्याची ग्वाही दिली. मुख्यमंत्री देखील माझ्याशी बोलले. त्यांनी देखील शब्द दिला. पण प्रत्यक्षात त्यांनी तो पाळला नाही" असं संभाजीराजेंनी म्हटलं आहे.
"संस्थेची स्वायत्तता काढून घेण्याचा प्रयत्न सुरू आहे. त्याला निधी दिला नाही. दिलेला निधी परत पाठवला. संस्थेतील अधिकाऱ्याने भ्रष्टाचार केला म्हणून त्याची चौकशी केली. पण नंतर त्याबाबत निकाल दिला नाही. तो चुकला असेल तर शिक्षा का केली नाही. हे करण्यामागे केवळ मराठा समाजाला बदनाम करण्याचे षडयंत्र आहे" असं देखील यावेळी संभाजीराजे यांनी म्हटलं आहे. तसेच मुख्यमंत्री ठाकरे यांच्यासह उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी तातडीने यामध्ये हस्तक्षेप करत मागण्यांची पूर्तता करावी, याबाबत तातडीने बैठक घ्यावी, अन्यथा पुन्हा एकदा मराठा समाजाला आंदोलन करावे लागेल. समाजाने हे आंदोलन सुरू केले तर मी त्यांच्या पाठीशी असेन असा इशाराही त्यांनी दिला.
संभाजीराजे यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून एक ट्विट केलं आहे. यामध्ये "मराठा समाजाच्या वतीने पुण्यात आंदोलन केलं, तिथे जी आश्वासने सरकारच्या वतीने समाजाला दिली गेली, त्यापैकी किती पूर्ण केली? स्वायत्ता राखणार असा शब्द दिला होता, आज सारथी संस्था स्वायत्त राहिली आहे का? संस्थेमध्ये गैरव्यवहार केला असा आरोप करून संस्था बदनाम केली गेली. तिची चौकशी सुद्धा केली, त्याचे पुढे काय झाले? की तो केवळ फार्स होता? मुळात सारथी संस्था कोण कोणत्या उद्दिष्टांकरिता अस्तित्वात आली होती? आणि आता कोणती उद्दिष्टे समोर आणली जात आहेत?. सारथीच्या बाबतही समाजाला जे पाहिजे तेच होईल. संस्था ज्यांच्या नावाने आहे, त्या राजर्षी शाहू महाराजांच्या वंशजाच्या नात्याने समाज जागा करणं हे माझं कर्तव्य समजतो. सारथीच्या स्वायत्ततेसाठी आणि मराठा समाजातील भावी पिढीच्या कल्याणासाठी मराठा समाजाने पुन्हा एकदा एकत्र येण्याचे आवाहन करतो" असं म्हटलं आहे.
महत्त्वाच्या बातम्या
CoronaVirus News : बापरे! परीक्षा पडली महागात; तब्बल 32 विद्यार्थ्यांना कोरोनाची लागण
संतापजनक! मास्क न लावण्यावरून झाला वाद, भाजप नेत्याची पोलिसांना मारहाण
CoronaVirus News : देशातील रुग्णसंख्येने पुन्हा रेकॉर्ड मोडला; पण 'या' आकडेवारीने मोठा दिलासा
देशातील 'या' राज्यात कुत्र्याच्या मांसची विक्री, सरकारने घातली बंदी
CoronaVirus News : बघूया सर्वात आधी कोणाला होतोय कोरोना; लागण होण्यासाठी रुग्णासोबत पार्टीचं आयोजन