Sanjay Raut on Jayakumar Rawal: खासदार सुप्रिया सुळे यांनी शरद पवार गटाच्या जिल्हा आढावा बैठकीत बोलताना मोठा गौप्यस्फोट केला. शंभर दिवसांत एक बळी गेला आहे, सहा महिने थांबा आणखी एक बळी जाणार आहे, असा दावा सुप्रिया सुळे यांनी केला. त्यानंतर बोलताना खासदार संजय राऊत यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सरकारमधील मंत्र्यावरही गंभीर आरोप केले आहेत. भाजपच्या मंत्र्याने माजी राष्ट्रपतींची जमीन लाटण्याचा आरोप संजय राऊत यांनी केला.
सुप्रीय सुळे यांनी केलेल्या दाव्यावर बोलताना संजय राऊत यांनी सरकारमधील सात ते आठ मंत्र्यांनी महाराष्ट्राचे वातावरण खराब केल्याचे म्हटलं. यावेळी राज्याचे पणन मंत्री व धुळे जिल्ह्याचे पालकमंत्री तसेच राज्य शिष्टाचार मंत्री जयकुमार रावल यांच्यावर संजय राऊत यांनी जोरदार टीका केली आहे.
"महाराष्ट्रात मंत्रिमंडळात अशी अनेक पात्रे आहेत ज्यांचे चेहरे आता समोर येत आहेत. धनंजय मुंडे यांचा बळी गेला. जयकुमार रावल यांनी रावल को ऑपरेटिव्ह बँकेमध्ये कोट्यवधि रुपयांचे घोटाळे करुन ठेवले आहेत. कुटुंबातले खोटे कर्जदार तयार करुन कोट्यवधि रुपये लाटले. हे प्रकरण मी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पाठवणार आहे. त्यांना मी विचारणार आहे की, तुम्ही तुमच्या आसपासच्या लोकांना जनतेचा पैसा लुटण्याचा परवाना दिला आहे का? जयकुमार रावल अत्यंत भ्रष्ट कारभार करणारे मंत्री आहेत," असं संजय राऊतांनी म्हटलं.
"माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांची जमीन या महाशयांनी लाटली. राष्ट्रपतींची जमीन लाटण्यापर्यंत यांची हिम्मत गेली. हायकोर्टाने या लुटमारीवर आता ताशेरे ओढले आहेत. असे मंत्री या सरकारमध्ये आहेत. असे रावल एकटेच नाहीत. किमान सात ते आठ मंत्री या सरकारमध्ये आहेत ज्यांनी या महाराष्ट्राचे वातावरण खराब केलं आहे. अशा मंत्र्यांचे बळी जाणारच. हे बळी घेण्यासाठी भाजपचेच लोक आम्हाला हत्यारं पुरवत आहेत त्यांचा मी आभारी आहे," असंही संजय राऊत म्हणाले. मंत्री जयकुमार रावल यांनी माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांची २६ एकर जमीन हडप केल्याचा आरोप करण्यात आला आहे. धुळे जिल्हा न्यायालयाने रावल कुटुंबाने माजी राष्ट्रपतींची जमीन त्यांना परत करण्याचे आदेश दिल्याचे देखील म्हटलं जात आहे. माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांची दोंडाईचा शिवारातील तब्बल २६ एकर जमीन हडप केल्याचा आरोप माजी आमदार अनिल गोटे यांनी केला. जयकुमार रावल आणि त्यांच्या कुटुंबीयांनी खोट्या कागदपत्रांच्या आधारे माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांची जमीन हडप केल्याचा आरोप अनिल गोटे यांनी केला.