"एकनाथ शिंदे मौलवीच्या वेशात अनेकदा दिल्लीला गेले, अन्..."; संजय राऊतांचा दावा
By ऑनलाइन लोकमत | Published: July 30, 2024 12:01 PM2024-07-30T12:01:37+5:302024-07-30T12:03:16+5:30
अजित पवार, एकनाथ शिंदे यांच्यावर संजय राऊतांचा प्रहार, राज ठाकरेंनाही जोरदार टोला
नवी दिल्ली - देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे हे सरकार पाडण्याआधी दिल्ली, मुंबईत वेश पालटून फिरत होते. माझ्या माहितीनुसार, एकनाथ शिंदे जेव्हा जेव्हा दिल्लीला गेलेत ते मौलवीच्या वेशात गेले. त्यांना दाढी आहेच, पण नाव बदलून ते मौलवीच्या वेशात दिल्लीत गेले होते असा दावा उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केला आहे. अजित पवार-अमित शाह यांच्या गुप्त बैठकींवर टीका करत संजय राऊतांनी एकनाथ शिंदे-अजित पवार आणि देवेंद्र फडणवीसांचाही समाचार घेतला आहे.
दिल्लीत घेतलेल्या पत्रकार परिषदेत संजय राऊत म्हणाले की, शिंदेंनी धर्मवीर चित्रपटाची निर्मिती केली असली, आनंद दिघेंचे शिष्य म्हणवत असले तरी ते अनेकदा दिल्लीत मौलवीच्या वेशात आलेत. नाव बदलून अमित शाहांना भेटले, अजित पवार वेशांतर करून नाव बदलून दिल्लीत येतात. एकनाथ शिंदे वेशांतर करून येतात. मात्र त्यांना विमानतळावर कुणी रोखत नाही. या दोघांनी बनावट ओळखपत्र बनवलेली आहे. पॅनकार्ड, पासपोर्ट, आधारकार्ड बनवलेली आहे. ओळखपत्राशिवाय विमानतळावर सोडलं जात नाही. या प्रकाराची राष्ट्रीय सुरक्षेच्या दृष्टीने दखल घेऊन चौकशी होणं गरजेचे आहे. यातून त्यांनी दहशतवाद्यांना प्रेरणा दिली आहे असंही त्यांनी सांगितले.
तसेच महाराष्ट्रातील प्रमुख लोक यावर चर्चा करणार आहोत. हा प्रश्न अजित पवार, अमित शाहांचा नाही. आमच्यासाठी हा गंभीर विषय आहे. या देशात चीन का घुसतंय, काश्मीरमध्ये दहशतवादी का घुसतायेत हे या लोकांनी दाखवून दिलंय. फक्त वेश पालटून दिल्लीत गेले नाही तर बनावट नावांनी आलेत. AP अनंतराव, A पवार अशा विविध नावांनी दाढी मिशा लावून वेश बदलून आले होते. या महाराष्ट्राला रंगभूमीची परंपरा आहे. विष्णूदास भावेंनी १८४२-४४ मध्ये रंगभूमीची स्थापना केली. त्यानंतर हे नवे बारामतीचे विष्णूदास भावे तयार झालेत. विमानतळाची सुरक्षा किती दुर्लक्षित आहे, एखादा माणूस त्याच्या स्वार्थासाठी वेश बदलून दिल्ली, मुंबईसारख्या विमानतळावर घुसू शकतो. त्याच अवस्थेत तो या देशाच्या गृहमंत्र्यांना भेटतो. हा राष्ट्रीय सुरक्षेचा खेळ आहे असा घणाघात संजय राऊतांनी केला आहे.
राज ठाकरेंवर शेलक्या शब्दात टीका
दरम्यान, मी सुपारीबाजांबद्दल बोलत नाही. कधीकाळी लोकसभेत वेगळ्या पक्षाची सुपारी होती. विधानसभेला वेगळ्या पक्षाची सुपारी आहे. महाराष्ट्राच्या राजकारणात जे सुपारीचं पीक आलेलं आहे. या सर्व सुपाऱ्या आहेत. भाजपा आणि शिंदे गट हे कधीही सुपाऱ्या कातरायचं काम करतात असं सांगत संजय राऊतांनी राज ठाकरेंवर प्रहार केला आहे. महायुतीत मनसे तिसरा भिडू होण्याचा प्रयत्न करतंय असा प्रश्न पत्रकारांनी संजय राऊतांना विचारला होता त्यावर राऊतांनी हे भाष्य केले.