Sanjay Raut on Nitin Gadkari : पंतप्रधान मोदी यांच्या मंत्रिमंडळातील कार्यक्षम आणि लोकप्रिय चेहरा असणारे खासदार नितीन गडकरी हे त्यांच्या स्पष्टवक्तेपणासाठी नेहमीच ओळखले जातात. आता केंद्रीय रस्ते आणि वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी मोठा दावा केला आहे. लोकसभा निवडणुकीपूर्वी आपल्याला पंतप्रधानपदाची ऑफर देण्यात आली होती, मात्र आपण ही ऑफर नाकारली असल्याचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी म्हटले. विरोधी पक्षातील एका बड्या नेत्याने ही ऑफर दिली होती, पण मला या पदाची इच्छा नाही, असे सांगून मी ती नाकारल्याचे मंत्री गडकरी म्हणाले. नितीन गडकरी यांच्या या विधानावर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी भाष्य केलं आहे.
नागपूरातील एका कार्यक्रमात नितीन गडकरींनी हे वक्तव्य केलं आहे. लोकसभा निवडणुकीदरम्यान एका विरोधी पक्षनेत्याने पंतप्रधान होण्यासाठी त्यांच्याशी संपर्क साधला होता, असं गडकरींनी म्हटलं. २०२४ च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी विरोधी पक्षाच्या एका वरिष्ठ नेत्याने पंतप्रधानपदाची ऑफर घेऊन त्यांच्याशी संपर्क साधला होता, असा खुलासा नितीन गडकरी यांनी केला. मात्र नितीन गडकरी यांच्या या दाव्यावर खासदार संजय राऊत यांनी यात काही चुकीचे आहे असं मला वाटत नाही असं म्हटलं आहे.
"नितीन गडकरी हे भाजमधील सर्वमान्य असे नेते आहेत. पंतप्रधान पदासाठी तडजोड करा असं त्यांना कोणी सांगितले असेल असं मला वाटत नाही. मुळात या देशात हुकूमशाही, एकाधिकारशाही सुरु आहे. १० वर्षापासून ज्या प्रकारे आणीबाणी लावण्याचा प्रयत्न केला गेला त्याच्याशी तडजोड करु नका अशी भूमिका विरोधी पक्षातील नेत्याने त्यांच्याकडे मांडली असेल तर त्यात काही चुकीचे आहे असं मला वाटत नाही. आज सरकारमध्ये बसून देशातील मूल्यांची तडजोड करत आहेत तो एक राष्ट्रीय अपराध आहे. नितीन गडकरी या सगळ्याच्या विरोधात बोलत राहिले, आपला आवाज मांडत राहिले. म्हणूनच त्यांना कोणी विरोधी पक्षाच्या नेत्याने सल्ला दिला असेल तर फास त्रास होण्याचे कारण नाही. जगजीवन राम यांनी १९७७ साली काँग्रेस पक्षातून याच मुद्द्यावरुन बंड केले होते. देशात लोकशाही टिकवायची असेल तर काही जणांना सत्तेचा त्याग करावा लागतो," असं खासदार संजय राऊत म्हणाले.
काय म्हणाले नितीन गडकरी?
“मला चांगलं लक्षात आहे, मी कुणाचंही नाव घेणार नाही. मात्र त्या व्यक्तीने मला सांगितलं होतं, तुम्ही पंतप्रधान होणार असाल तर आम्ही पाठिंबा देऊ. मी त्यांना विचारलं की तुम्ही मला पाठिंबा का द्याल? तसंच मी तुमचा पाठिंबा का घेऊ? पंतप्रधान होणं हे माझ्या आयुष्याचं ध्येय नाही. मी माझी मूल्यं, विचार आणि माझी संघटना यांच्याशी प्रामाणिक आहे. मी कुठल्याही पदासाठी तडजोड करत नाही. मला माझ्या मूल्यांवर विश्वास आहे. भारतीय लोकशाहीचा आधार असलेली ही मूल्यं आहेत.” असं नितीन गडकरी यांनी म्हटलं. मात्र नितीन गडकरी यांची ही सगळी चर्चा नेमकी कुणाशी झाली? कधी झाली ? याची माहिती त्यांनी दिली नाही. मात्र आता त्यांच्या वक्तव्याने राजकीय वर्तुळात चर्चा सुरु झाल्यात.