“मविआमध्ये राष्ट्रवादी आता मोठा भाऊ”; अजितदादांच्या विधानावर संजय राऊतांचा पलटवार, म्हणाले...
By ऑनलाइन लोकमत | Published: May 21, 2023 02:46 PM2023-05-21T14:46:02+5:302023-05-21T14:48:16+5:30
Maharashtra Politics: आपल्या कार्यकर्त्यांना बळ देण्याकरता अशा भूमिका घ्याव्या लागतात, असे संजय राऊत यांनी म्हटले आहे.
Maharashtra Politics: कर्नाटक विधानसभा निवडणुकीत काँग्रेसने भाजपला धूळ चारल्यानंतर महाराष्ट्रातील महाविकास आघाडीत नवउत्साह संचारला आहे. मात्र, दुसरीकडे महाविकास आघाडीतील अंतर्गत वाद चव्हाट्यावर येताना दिसत आहे. महाविकास आघाडीत राष्ट्रवादीच मोठा भाऊ असल्याचे विधान राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी केले आहे. यावर आता ठाकरे गटाचे नेते आणि खासदार संजय राऊत यांनी पलटवार केला आहे.
आपण महाविकास आघाडीचा घटक पक्ष आहोत. आघाडी आपल्याला मजबूत ठेवायची आहे. पण हे करत असताना लक्षात ठेवा की, तुमची ताकद जास्त असेल तरच तु्म्हाला महाविकास आघाडीत महत्त्व दिले जाईल. याआधीच्या प्रत्येक निवडणुकीत काँग्रेसच्या जागा जास्त असायच्या. जागा वाटप करताना आपल्याला लहान भाऊ म्हणून भूमिका घ्यावी लागायची. पण आता आपण काँग्रेसपेक्षा मोठे भाऊ झालो आहोत. कारण त्यांच्या ४४ जागा आहेत आणि ५४ जागा आहेत. उद्धव ठाकरेंकडे ५६ आमदार होते. हे गणित आहे, असे अजित पवार यांनी म्हटले होते. महाविकास आघाडीचा जागावाटपाचा फॉर्म्युला ठरायचा आहे. मात्र, त्याआधीच अजित पवारांनी केलेले विधान राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरत आहे. याला संजय राऊतांनी उत्तर दिले.
महाविकास आघाडीत कोणत्याही प्रकारे अशाप्रकारचे मतभेद नाहीत
सगळ्यांची डीएनए टेस्ट करू आम्ही एकदा. हा विनोद समजून घ्या. लहान भाऊ, मोठा भाऊ हा विषय मधल्या काळात शिवसेना-भाजपा युतीमध्ये सुद्धा आला होता. तेव्हाही मी म्हणालो होतो की डीएनए टेस्ट करावी लागेल. महाविकास आघाडीत कोणत्याही प्रकारे अशाप्रकारचे मतभेद नाहीत. अजित दादा काय म्हणतात? आम्ही काय म्हणतो? याही पेक्षा प्रत्येकजण आपआपल्या पक्षाची भूमिका मांडत असतो. आपल्या कार्यकर्त्यांना बळ देण्याकरता अशा भूमिका घ्याव्या लागतात, असे संजय राऊत म्हणाले.
दरम्यान, लोकसभेच्या जागावाटपाची प्रक्रिया सुरू आहे. आधी लोकसभेची निवडणूक होईल, मग विधानसभेची होईल. लोकसभेच्या जागावाटपासंदर्भात प्रमुख पक्षांच्या बैठका सुरू आहेत. या बैठकीत काय ठरते हे तुम्हाला बाहेर सांगणार नाही, असे संजय राऊत यांनी स्पष्ट केले.