Sanjay Raut News: राज्यातील विधानसभा निवडणूक ऑक्टोबरच्या तिसऱ्या आठवड्यात होणार असे सर्वत्र मानले जात असताना ही निवडणूक नोव्हेंबरच्या दुसऱ्या आठवड्यात म्हणजे दिवाळीनंतरच होईल, अशी खात्रीलायक माहिती हाती आली आहे. यातच सर्वच पक्षांच्या तयारीला वेग आला आहे. राज्यभरात दौरे, बैठकांचे सत्र सुरू आहे. यातच आरक्षणाच्या मुद्द्यावरून राजकीय वातावरण तापलेले पाहायला मिळत आहे. तर निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अनेक दावे केले जात आहेत. मुख्यमंत्रीपदाचा दावेदार कोण, यावरून महाविकास आघाडीत एकमत नसल्याचे पाहायला मिळत आहे. यावर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी भाष्य केले आहे.
नाना पटोले यांची अडचण समजू शकतो. सर्वांची बाजू समजू शकतो. नाना पटोले आमचे मित्र आहेत. आमचे सहकारी आहेत. परंतु, महाराष्ट्राला प्रिय असणाऱ्या चेहऱ्याविषयी बोलतो. नाना पटोले यांच्या मनात एखाद्या व्यक्तीचे नाव असेल तर त्यांनी ते सांगावे. मात्र राज्यातील ११ कोटी लोकांच्या मनात कोणता चेहरा आहे त्याबद्दल बोलत आहे आणि मला त्याबद्दल बोलण्याचा अधिकारही आहे, असे संजय राऊत यांनी म्हटले आहे.
काँग्रेसच्या मुख्यमंत्रीपदाच्या चेहऱ्याचे नाव नाना पटोलेंनी जाहीर करावे
सन २०१९ च्या निवडणुकीनंतर मीच म्हणालो होतो की, उद्धव ठाकरे राज्याचे मुख्यमंत्री होतील. नाना पटोले त्यांच्या जागी बरोबर आहेत. त्यांनी केलेले वक्तव्य बरोबर आहे. महाविकास आघाडीचे सरकार येऊन आमचाच मुख्यमंत्री होणार आहे. दुसऱ्या बाजूला नाना पटोले यांच्याकडे मुख्यमंत्रिपदासाठी दुसरा कोणता चेहरा असेल तर ते त्यांनी जाहीरपणे सांगावे. काँग्रेसकडे मुख्यमंत्रिपदासाठी चेहरा असेल आणि त्यांनी त्याबद्दल जाहीर वाच्यता केली तर त्याला हरकत नसेल. काँग्रेसमध्ये चेहरा असेल तर त्यांनी सांगावे की, हा आमचा मुख्यमंत्रिपदाचा चेहरा आहे. नाना पटोले ज्या नेत्याचे नाव सांगतील आम्ही त्याचे स्वागतच करू, असे संजय राऊत म्हणाले.
दरम्यान, काँग्रेसकडे मुख्यमंत्रिपदासाठी चेहरा नाही, असे तुम्हाला म्हणायचे आहे का? असा प्रश्न पत्रकारांनी विचारला. यावर, तसे नाही, परंतु काँग्रेसने सांगायला हवे. ही लोकशाही आहे. त्यांनी त्यांचा मुख्यमंत्रिपदाचा चेहरा सांगावा. त्यांच्याकडे अनेक नेते आहेत पण काँग्रेसने त्यांची नावे जाहीर करावी. काँग्रेसने १० जणांची यादी जाहीर करावी की आमच्याकडे मुख्यमंत्रिपदासाठी हे १० चेहरे आहेत, असे संजय राऊतांनी सांगितले.