Sharad Pawar ( Marathi News ) : आज फलटणच्या संजीवराजे नाईक निंबाळकर आणि आमदार दीपक चव्हाण राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश केला.यावेळी खासदार शरद पवार यांची उपस्थिती होती. यावेळी खासदार पवार यांनी 'मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेवरुन महायुती सरकारवर जोरदार निशाणा साधला.
अजित पवारांना धक्का! रामराजेंचे विश्वासू आमदार दीपक चव्हाणांच्या हाती 'तुतारी'
खासदार शरद पवार म्हणाले, मी मागच्या निवडणुकीवेळी धैर्यशील मोहिते यांच्या सभेवेळी आलो होतो तेव्हा तुमच्या सगळ्यांचे चेहरे खाली होते, आता या सभेला तुम्ही खुलून दिसत आहात. मला तुमच्या डोळ्यावरुन मन कळते. आता जे झालं ते झालं, आपले संबंध अनेक वर्षाचे आहेत, असंही पवार म्हणाले. 'आमचे अनेक वर्षाचे फलटण सोबतचे संबंध आहेत. फलटण आणि बारामती एकच आहे.
...पहिला ठराव फटलणमध्ये झाला होता
"आज पुन्हा एकदा महाराष्ट्र उभा करायचा आहे. महाराष्ट्र उभा करण्यासाठी एकेकाळी माझ्यासारखी व्यक्ती कॉलेजमध्ये शिकत होती.त्यावेळी राज्यात चळवळ झाली, त्यावेळी फलटणही चळवळीत सहभागी झाली. यशवंतराव चव्हाण यांच्यासारखा नेते महाराष्ट्रात झाला. यशवंतराव चव्हाण यांना मुख्यमंत्री पदावर नेमण्यासाठी पहिला ठराव फलटणमध्ये झाला. तो ठराव राजेसाहेबांनी मांडला. त्यावेळी यशवंतराव चव्हाण मुख्यमंत्री झाले आणि मराठी लोकांचे हे राज्य झाले. हे राज्य तयार करण्यात फलटणकरांचे योगदान कधी विसरता येणार नाही, असंही शरद पवार म्हणाले.
मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेवरुन खोचक टोला
खासदार शरद पवार पुढे म्हणाले, महाराष्ट्र आता सामान्य लोकांच्या हातात द्यायचा की आणखी कोणाच्या हातात द्यायचा. आता या सरकारने रोज एक नवीन योजना आणायला सुरुवात केली आहे. वर्तुमानपत्र उघडलं की एक योजना असतेच. या सरकारने बहिणींसाठी एक योजना आणली आहे. कोणालाही आपल्या बहिणीसाठी आस्था असतेच. बहीण ही आपली जीवा भावाची सर्वात महत्वाची व्यक्ती असतेच म्हणून बहिणीचा सन्मान केला की माझ्यासारख्या आणि तुमच्यासारख्यांना आनंद होतोच. पण, एक गंमत आहे की यांना दहा वर्षात बहीण आठवली नाही, पाच वर्षे देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली राज्यातील सरकार होतं. तेव्हा यांना बहीण दिसली नाही, नंतरच्या काळात बहीण दिसली नाही. बहीण दिसली कधी कालच्या लोकसभा निवडणुकीमध्ये महाराष्ट्रात ४८ पैकी ३१ जागा आम्ही जिंकल्या त्याचा परिणाम असा झाला की यांना बहीण आठवली.त्या आधी यांना बहीण आठवली नव्हती, असा निशाणा खासदार शरद पवार यांनी साधला.