लोकमत न्यूज नेटवर्क
कल्याण:कल्याणडोंबिवलीतील प्रमुख समस्यांपैकी एक म्हणजे वाहतूक कोंडी ! मात्र येत्या वर्षभरात कल्याण डोंबिवली शहरातील वाहतुकीची समस्या दूर होईल असा विश्वास खासदार डॉ श्रीकांत शिंदे यांनी व्यक्त केला आहे. शहरात विकासाची कामे सुरू असून लवकरच वाहतूक कोंडी दूर होईल असे ते म्हणाले.डोंबिवलीतील एमआयडीसी विभागातील सर्व रस्त्यांसाठी मंजूर झालेल्या 110 कोटी रुपयांच्या निधींबाबत माहिती देण्यासाठी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
डोंबिवलीतील मोठागाव माणकोली उड्डाणपूल काही महिन्यात पूर्ण होणार आहे. काही महिन्यांपूर्वी पत्रिपुलाचे काम पूर्ण झाले. नवीन दुर्गाडी पुलाच्या दोन लेनही वाहतुकीसाठी खुल्या करण्यात आल्या असून उर्वरित पुलाचे कामही लवकर केले जाईल. कल्याण शिळ मार्गावरील उड्डाणपूलही काम प्रगती पथावर आहे. रिंगरोडचे कामही येत्या वर्षभरात पूर्ण होईल असे खासदार शिंदे यावेळी म्हणाले. त्यामुळे वर्षभरात वाहतूक कोंडीची समस्या दूर होईल असे त्यांनी आवर्जून सांगितले.
एमआयडीसीच्या रस्त्यांच्या कामासाठी एमआयडीसीकडून 57 आणि एमएमआरडीएकडून 53 असा तब्बल 110 कोटीचा निधी मंजुर करून घेण्यात आपल्याला यश आले असून यामुळे एमआयडीसी परीसरातील 35 रस्ते सिमेंट काँक्रिटचे होणार आहेत असेही ते म्हणाले. केडीएमसी आणि एमआयडीसी या दोन्ही शासकीय संस्था लवकरच या रस्त्यांच्या कामाचे टेंडर काढतील आणि त्यांचे काम सुरू होईल. तोपर्यंत इथल्या रस्त्यांची केडीएमसी प्रशासनामार्फत डागडुजी केली जाणार असल्याचेही शिंदे यांनी यावेळी स्पष्ट केले.
आम्ही श्रेयवादात पडत नाही. जे काम करतो ते छातीठोकपणे सांगतो. घोषणाबाजीही करत नाही असे सांगत अप्रत्यक्षरित्या त्यांनी भाजपाला टोला लगावला. आपण काय करतो किंवा बाकी कोण काय करतं यापेक्षा माझे काम काय? मला लोकांनी कशाला निवडून दिले आहे या विकासाच्या दृष्टीने आपण काम करत असल्याचेही खासदार शिंदे यांनी स्पष्ट केले.