मुंबई : राज्यात अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठ्याप्रमाणावर नुकसान झाले असताना, पिक विमा भरूनही विमा कंपन्यांकडून नुकसानभरपाई मिळत नसल्याने शिवसेनेने आक्रमक भूमिका घेतली असल्याचे पाहायला मिळत आहे. असे असताना आता भाजपचे खासदार सुजय विखे यांनी सुद्धा पीक विमा कंपन्यांच्या कारभारावर नाराजी व्यक्त करत टीका केली आहे.
अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीची विखे यांनी भाळवणी, वासुंदे, कर्जुलेहर्या येथे भेट देऊन पाहणी केली. यावेळी त्यांनी झालेल्या नुकसानाची भरपाई शेतकऱ्यांना मिळवून देण्याचे आश्वासन दिले. तर याचवेळी त्यांनी पीक विमा कंपन्यांवर टीका सुद्धा केली. पीकविमा कंपन्या हा महाराष्ट्राला लागलेला सर्वात मोठा शाप आहे. या कंपन्यांच्या भोंगळ कारभारामुळे शेतकऱ्यांना न्याय देण्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे स्वप्न भंग होत असल्याचे ते यावेळी म्हणाले.
मी कोणत्याही पक्षाचा असलो तरीही माझ्यासाठी आधी शेतकरी महत्वाचा आहे. त्यामुळे वेळप्रसंगी शेतकऱ्यांना सोबत घेऊन विमा कंपन्यांसमोर बेमुदत उपोषण करण्याचा इशारा सुद्धा सुजय विखे यांनी दिला. पीक विमा कंपनीचा एकच प्रतिनिधी तालुकापातळीवर आहे. लोक ऑनलाइन अर्ज करतात. त्यानंतर त्यांनी भरपाई मागायची कोणाकडे? असा प्रश्न त्यांनी यावेळी उपस्थित केला आहे.
पीक विमा भरून सुद्धा शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळत नसल्याने गेल्या काही महिन्यापूर्वी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेने विमा कंपनीवर मोर्चा काढला होता. त्यांतर आता पुन्हा शिवसेना याच मुद्यावरून आक्रमक होत असल्याचे पाहायला मिळत होते. मात्र आता भाजपचे खासदार सुजय विखे यांनी सुद्धा विमा कंपनीच्या विरोधात उपोषण करण्याचा इशारा दिला आहे. तर विमा कंपन्यांच्या चुकीच्या कारभारामुळे शेतकऱ्यांना न्याय मिळत नसल्याची भूमिका सुद्धा त्यांनी यावेळी व्यक्त केली.