"तुम्ही केव्हा उठता हा तुमच्या बायकोचा प्रॉब्लेम"; नाव न घेता सुप्रिया सुळेंचा अजित पवारांना टोला
By ऑनलाइन लोकमत | Published: August 31, 2024 03:04 PM2024-08-31T15:04:40+5:302024-08-31T15:04:48+5:30
पुरंदमध्ये बोलताना खासदार सुप्रिया सुळे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे नाव घेता त्यांच्यावर अप्रत्यक्षरित्या निशाणा साधला आहे.
Supriya Sule : उपमुख्यमंत्री अजित पवार हे आपल्या रोखठोक वक्तव्यांसाठी आणि धडाकेबाज कार्यशैलीसाठी ओळखले जातात. अनेकदा अजित पवार हे पहाटेपासूनच अधिकाऱ्यांसोबत आपल्या कामांना सुरुवात करताना पाहायला मिळाले आहेत. अनेकदा कार्यक्रमस्थळी लवकर पोहोचणाऱ्या अजित पवार यांच्यामुळे अधिकाऱ्यांची तारांबळ उडताना पाहायला मिळाली आहे. अजित पवार यांनीही बहुतेकवेळा मी सकाळी लवकर उठून कामाला सुरुवात करतो, असं म्हटलं आहे. मात्र आता याच विधानावरुन खासदार सुप्रिया सुळे यांनी अजित पवार यांना लक्ष्य केलं आहे.
पुरंदरमध्ये बोलताना सुप्रिया सुळे यांनी अजित पवार यांच्या या विधानाचा चांगलाच समाचार घेतला. मी सकाळी लवकर उठतो, मग काय उपकार करता का? असं म्हणत सुप्रिया सुळे यांनी अजित पवारांचे नाव न घेता त्यांच्यावर अप्रत्यक्षरित्या टीका केली. यावेळी बोलताना मला एका कोटीमध्ये शून्य किती असतात ते माहीत नाही असं म्हणत आमदार दत्तात्रय भरणे यांनाही टोला लगावला.
"इंदापूरचे आमदार दत्तामामा भरणे मतदारसंघांमध्ये ५ हजार कोटी रुपयांची विकासकामे केल्याचे सांगतात. हा आकडा म्हणजे काही विनोद नाही. मला एका कोटीमध्ये शून्य किती असतात ते माहीत नाही. सत्ता येत असते जात असते. मात्र, तुम्ही लोकांचा विचार कधी करणार? कोणी कोणावर उपकार करत नसतं. प्रत्येकजण आपापल्या परीने काम करत असतो," असं सुप्रिया सुळे म्हणाल्या.
"कोणी कुणावर उपकार करत नाही. हे सांगतात आम्ही दिवसरात्र काम करतो. आम्ही तुम्हाला आग्रह केला होता का? तुम्हाला हौस आहे आमदार आणि मंत्री व्हायची. त्यामुळे काम करा. आमच्यावर उपकार करता का? ही विचार करायची पद्धत बदलली पाहिजे. कष्ट सगळेच करतात. लोकांचा डायलॉग माझ्यामुळे बंद झाला. मी सकाळी लवकर उठतो. मी म्हणाले दुधवाला पण लवकर उठतो. ४ वाजता उठता मग गावात भाषण करताना सांगता का मी लवकर उठतो. तुम्ही किती वाजता उठता हा तुमच्या बायकोचा प्रॉब्लेम आहे माझा नाही. तिला चहा करावा लागतो. शरद पवारांनी असं कधी भाषण केले आहे का?," असंही सुप्रिया सुळेंनी म्हटलं.