राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी पक्षाच्या २४व्या वर्धापनदिनी एक मोठी घोषणा करत कार्यकारी अध्यक्षपदी सुप्रिया सुळे आणि प्रफुल्ल पटेल यांची नियुक्ती केली. यानंतर राष्ट्रवादीत घराणेशाही सुरू असल्याची टीका विरोधक करत आहेत. या टीकेला प्रत्युत्तर देताना खासदार सुप्रिया सुळे सांगितले, होय, ही घराणेशाहीच आहे आणि मी शरद पवार आणि प्रतिभा पवार यांची मुलगी असल्याचा सार्थ अभिमान आहे.
तसेच अजित पवार नाराज आहेत का? या प्रश्नावर बोलताना सुळे यांनी पत्रकारांची फिरकी घेत ते कोणत्या प्रश्नावर नाराज आहेत हे अधोरेखित करा अशी विचारणा केली. "केंद्रातील माझं रिपोर्टिंग शरद पवार आणि प्रफुल्ल पटेल यांच्याकडे असेल आणि राज्यातील रिपोर्टिंग अजित पवार, जयंत पाटील आणि छगन भुजबळ यांच्याकडे असेल", असे त्यांनी नमूद केले. शिवाय कार्यकारी अध्यक्ष पदासाठी अजित पवारांनी लॉबिंग केले का? या प्रश्नावर सुळे यांनी हा पक्ष लॉबिंगने नाही तर चर्चेतून चालतो, असे म्हटले.
अजित पवारांचा रोल मोठा - सुप्रिया सुळेराष्ट्रवादी कॉंग्रेसमधील नव्या नियुक्तीनंतर अजित पवार नाराज असल्याची चर्चा राजकीय चर्चा वर्तुळात आहे. याबाबत प्रश्न विचारला असता सुप्रिया सुळेंनी म्हटले, "अजितदादांचा विरोधी पक्षनेते पदाचा रोल मोठा आहे. लोकशाहीत विरोधी पक्षनेत्याची भूमिका मुख्यमंत्र्यासारखी असते. तसेच मला कार्यकारी अध्यक्षपद मिळेल याची कल्पना देखील नव्हती."
"सोयीप्रमाणे लोकांना पवारांची घराणेशाही दिसते"सुप्रिया सुळे यांना कार्यकारी अध्यक्ष बनवल्यानंतर राष्ट्रवादीत घराणेशाही सुरू असल्याची टीका विरोधक करत आहेत. याला सुप्रिया सुळेंनी पत्रकारांशी बोलताना आज प्रत्युत्तर दिले. "होय, ही घराणेशाहीच आहे. ज्या घरात माझा जन्म झाला त्याचा मला सार्थ अभिमान आहे. जे आरोप करतात त्यांच्या पक्षातील घराणेशाही मी लोकसभेत दाखवून दिली आहे. जेव्हा देशात मला एक नंबरचे रॅंकिग मिळते तेव्हा माझे वडील हे रॅंकिग देत नाहीत. शरद पवारांची मुलगी म्हणून मी संसदरत्न होत नाही. तेव्हा घराणेशाही दिसत नाही, ती फक्त सोयीप्रमाणे दिसते", अशा शब्दांत त्यांनी विरोधकांचा समाचार घेतला.