सातारा : एकत्र यावं, असं मलाही वाटतं; पण वाटून काय होणार. टाळी एक हाताने वाजत नाही. त्यांची तशी इच्छा असेल तर माझा नकार नाही. एकत्र यायचं असेल तर कायमस्वरुपी, नाही तर त्याला काय अर्थ ? असे म्हणत खासदार उदयनराजे भोसले यांनी मनोमीलनाचा चेंडू आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्याकडे ढकलला. साताऱ्यात खासदार उदयनराजेंनी वृत्तवाहिन्यांशी बोलताना हे विधान केले. शनिवारी आमदार शिवेंद्रसिंहराजेंनी मनोमिलनाचा निर्णय उदयनराजेंनी घ्यावा, असे वक्तव्य केले होते. त्या पार्श्वभूमीवर उदयनराजेंनी आपली भूमिका स्पष्ट केली. खासदार उदयनराजे म्हणाले, माझं ओपन माईंड आहे. मी स्पष्टवक्ता असून, मला राजकारण करणं जमत नाही. कोणाच्या मतदारसंघात ढवळाढवळ केली नाही. नेहमीच समाजकारण केलं. त्यामुळे प्रत्येकाने आत्मपरीक्षण करावं. कोणी वाईट केलं, अन्याय होत असेल तिथे मी बोलणार. तडजोडीचे राजकारण मला जमत नाही. शिवेंद्रसिंहराजे बोलले ते योग्यच आहे. आमचे एक घराणे आहे. पण कार्यकर्त्यांना विश्वासात घेतलं पाहिजे. मी स्वार्थी होऊ शकत नाही. मला माझ्यापुरतं बघायचं नाही.शिवेंद्रसिंहराजेंचा खांदा का दाबला? या विषयावर खासदार उदयनराजे म्हणाले, ‘ते माझे भाऊ आहेत. त्यांच्या खांद्यावर हात ठेवायचा नाही तर कोणाच्या खांद्यावर हात ठेवायचा?', असा सवाल त्यांनी विचारला. मी माझी जबाबदारी स्वत: पेलतो. आता एकत्र यायचं असेल तर कायमस्वरुपी यावं, असं उदयनराजे म्हणाले.
शिवेंद्रसिंहांसोबतचा वाद मिटावा असं मलाही वाटतं, पण...- उदयनराजे
By ऑनलाइन लोकमत | Published: January 06, 2019 9:40 PM