मुंबई : नाणार रिफायनरी प्रकल्पावरून राणे कुटुंब आणि शिवसेनामधील वाद काही थांबायला तयार नाही. त्यामुळे दोन्ही कडून एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप केली जात आहे. तर नाणार प्रकल्पाच्या समर्थन मेळाव्यात जर कुणी शिवसैनिक आढळून आला तर त्यावर कडक कारवाई करण्यात येणार असल्याचा इशारा खासदार विनायक राऊत यांनी दिला होता. यावरून आता भाजप नेते निलेश राणे यांनी त्यांना प्रत्युत्तर दिले आहे.
रिफायनरी समर्थनासाठी डोंगर तिठा (ता. राजापूर) येथे आयोजित मेळाव्याला शिवसेनेचा गमछा किंवा झेंडा घेऊन कोणी शिवसैनिक रिफायनरीला पाठिंबा देईल त्याची गय केली जाणार नाही हा त्यांनी इशारा समजावा. यापुढे जो शिवसैनिक रिफायनरीचे समर्थन करेल त्याला झोडून काढावे, असं विनायक राऊत म्हणाले होते. तर झोडपण्याच्या इशाऱ्यानंतरही शिवसैनिकांकडून नाणारचे खुले समर्थन करण्यात आले होते. यावरून आता निलेश राणेंनी राऊत यांच्यावर निशाणा साधला आहे.
निलेश राणे यांनी ट्वीट करत म्हटलं आहे की, "हा खासदार नाही कोकणातला कोरोना व्हायरस आहे. जिथे जातो तिथे घाण करतो. कालच्या नाणार रिफायनरी प्रकल्प समर्थनाच्या सभेत शिवसैनिक जास्त होते. परवा जी धमकी मीटर चोर राऊत देऊन गेला होता, ती नेहमप्रमाणे फुसकी ठरली" असल्याचा खोचक टोला त्यांनी यावेळी लगावला.