खासदार विशाल पाटलांचा उद्धव ठाकरेंना दे धक्का; एकनाथ शिंदेंच्या उमेदवाराला पाठिंबा
By ऑनलाइन लोकमत | Published: August 18, 2024 04:34 PM2024-08-18T16:34:18+5:302024-08-18T16:36:13+5:30
सांगलीत पुन्हा एकदा ठाकरे विरुद्ध विशाल पाटील असा संघर्ष पाहायला मिळणार आहे.
सांगली - लोकसभा निवडणुकीत सांगलीच्या जागेवरून काँग्रेस आणि उद्धव ठाकरे यांच्यात प्रचंड टोकाचा वाद झाला होता. ठाकरेंनी हट्टाने सांगलीची जागा काँग्रेसकडून आपल्याकडे घेतली आणि त्याठिकाणी चंद्रहार पाटील यांना उमेदवारी दिली. मात्र ठाकरेंच्या उमेदवाराविरोधात काँग्रेस नेते विशाल पाटील यांनी बंडखोरी करत अपक्ष निवडणुकीला सामोरे गेले. या निवडणुकीत विशाल पाटलांनी दणदणीत विजय मिळवला. आता याच विजयात हातभार लावणाऱ्यांना विशाल पाटील मदत करणार आहेत. त्यात खानापूर मतदारसंघात सुहार बाबर यांच्या पाठिशी असल्याचं खासदार विशाल पाटील यांनी जाहीर केले आहे.
खासदार विशाल पाटील म्हणाले की, मतांच्या स्वरुपात लाखांच्या आकड्यात सुहास बाबर यांना पाठिंबा मिळावा. आम्ही अपक्ष आहोत, कुणाला घाबरत नाही. आम्हाला कुणी बोलायचे कारण नाही. जिथं आमच्यावर प्रेम दिसतंय तिथे आम्हाला प्रेम द्यायचे कळतंय. त्यामुळे आम्ही ताकदीनं तुमच्या पाठिशी राहणार यात शंका नाही असं त्यांनी जाहीर भूमिका मांडली त्यामुळे लोकसभेनंतर आता विधानसभेलाही विशाल पाटलांनी ठाकरे गटाशी भिडण्याचं ठरवलं आहे. तर सगळ्यांमध्ये ताळमेळ असणं गरजेचा आहे. महाविकास आघाडीचे जे घटक आहेत आम्हाला भाजपाप्रणित महाराष्ट्रद्वेष्टे सरकार आहे ते घालवण्याचं काम आपल्याला करायचं आहे असं सांगत आदित्य ठाकरेंनी विशाल पाटलांच्या भूमिकेवर प्रतिक्रिया दिली आहे.
सुहास बाबर महायुतीचे संभाव्य उमेदवार
खानापूर आटपाडी मतदारसंघात मागील निवडणुकीत शिवसेनेकडून अनिल बाबर निवडून आले होते. अनिल बाबर यांच्या रुपाने शिवसेनेने पश्चिम महाराष्ट्रातील या जागेवर भगवा झेंडा फडकवला. मात्र एकनाथ शिंदेंनी घेतलेल्या भूमिकेनंतर अनिल बाबर हे शिंदेसोबत गेले होते. अनिल बाबर यांच्या अकाली निधनामुळे खानापूर आटपाडी मतदारसंघात यंदाच्या निवडणुकीत कोण उभं राहणार अशी चर्चा आहे. त्यात अनिल बाबर यांचे पुत्र जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सुहास बाबर हे एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचे संभाव्य उमेदवार असतील असं बोललं जाते. त्यात महाविकास आघाडीत ही जागा उद्धव ठाकरेंच्या वाट्याला जाण्याची शक्यता आहे. त्यात खासदार विशाल पाटलांनी पुन्हा एकदा उद्धव ठाकरे गटाला दणका दिला आहे.