पुणे : मुख्यमंत्री कार्यालयाने महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (एमपीएससी) परीक्षा पुढे ढकलण्यासंदर्भात ट्विट केल्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला.मात्र,बुधवारी एमपीएससीने सुध्दा संकेतस्थळावर परीक्षेबाबत अधिकृत घोषणा केल्यामुळे विद्यार्थ्यांनी सुटकेचा निश्वास सोडला आहे. परंतु,परीक्षांच्या सुधारीत तारखा जाहीर न केल्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये काहीशी निराशा आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आयोगाच्या विविध परीक्षा पुढे ढकलल्या जात आहेत. आयोगाने प्रसिध्द केल्या वेळापत्रकानुसार २० सप्टेंबर रोजी घेतली जाणारी राज्य सेवा पूर्व परीक्षा पुढे ढकलण्यात आली आहे.त्याचप्रमाणे दुय्यम सेवा संयुक्त पूर्व परीक्षा, महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा सुद्धा पुढे ढकलली असून या सर्व परीक्षांच्या सुधारित तारखा स्वतंत्रपणे जाहीर केल्या जातील असे आयोगातर्फे स्पष्ट करण्यात आले आहे.कोरोनाच्या वाढत्या प्रादुभावामुळे मुख्यमंत्री कार्यालयाने एमपीएससीच्या सर्व परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय व्टिटरवरून जाहीर केला.परंतु,परीक्षा पुढे ढकलण्याचे अधिकार एमपीएससीकडे असताना मुख्यमंत्री कार्यालयाने 26 आॅगस्ट रोजी याबाबत घोषणा केल्यामुळे आश्चर्य व्यक्त केले जात होते.तसेच आयोगाने अधिकृत घोषणा न केल्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये संभ्रमाची स्थिती होती.मात्र, एमपीएससीने 2 स्प्टेंबर रोजी अधिकृत घोषणा केल्यामुळे परीक्षेबाबत निर्माण झालेल्या गोंधळावर पडदा पडला. ----------------- मुख्यमंत्री कार्यालयाने जाहीर केलेल्या निर्णयाला एमपीएससीने केवळ दुजोरा दिला आहे. नवीन तारखा जाहीर होतील,अशी अपेक्षा होती. मात्र,तारखा जाहीर न झाल्याने विद्यार्थ्यांमध्ये निराशा आहे.सातत्याने परीक्षा पुढे ढकलल्या जात असल्यामुळे अभ्यासाचे नियोजन करण्यात अडचणी येत आहेत.- सुहास कांबळे, स्पर्धा परीक्षार्थी.
............. राज्य सेवा पूर्व परीक्षा एमपीएससीच्या नियोजित वेळापत्रकाप्रमाणे होईल,असे वाटले होते.त्यामुळे घरच्यांचा विरोध पत्कारून गाव सोडून पुण्यात परीक्षा देण्यासाठी आलो. कोरोनाच्या वाढत्या प्रादुभार्वामुळे शहरात राहणे धोक्याचे वाटत असून नवीन तारखा जाहीर न झाल्याने निराशा झाली आहे. आता पुन्हा नवीन तारखांची वाट पहावी लागणार आहे. महेश चोबे, स्पर्धा परीक्षार्थी.