मुंबई/ठाणे : विविध कारणांनी गाजलेली राज्य सेवा पूर्व परीक्षा म्हणजे एमपीएससीची परीक्षा अखेर २१ मार्च रोजी पार पडत आहे. यासाठी राज्यभरातून तब्बल दहा हजार २३२ परीक्षार्थींची ठाणे जिल्ह्यातील ठिकठिकाणच्या २६ परीक्षा केंद्रांवर आसनव्यवस्था केलेली आहे. प्रश्नपत्रिका व उत्तरपत्रिकेसोबत या परीक्षार्थींना सॅनिटायझर व मास्कचेही परीक्षा केंद्रांवर वाटप करण्यात येणार आहे.
तहसीलदार, नायब तहसीलदार, पोलीस निरीक्षक, आरटीओ, आयकर आदी विभागांच्या वर्ग १ व वर्ग २ च्या पदांसाठी ही राज्य सेवा पूर्व परीक्षा २०१७ घेण्यात येत आहे. अखेर ठाणे शहर परिसरातील २६ शाळा, महाविद्यालयांच्या परीक्षा केंद्रांवर या दहा हजार २३२ परीक्षार्थींची आसनव्यवस्था केली आहे. सकाळी ११ ते ५ या वेळेत ही परीक्षा दोन सत्रांत घेतली जाणार आहे. यासाठी ८०० मनुष्यबळासह पोलीस यंत्रणा तैनात करण्यात आली आहे.कोरोना प्रतिबंधात्मक नियमांचे पालन करून ती घेतली जात आहे. या दहा हजारपेक्षा जास्त परीक्षार्थींना दोन एमएल सॅनिटायझर व प्रत्येकास मास्कचे वाटप परीक्षा केंद्रांवर करण्यात येणार आहे. याशिवाय लोकसेवा आयोगाच्या आदेशास अनुसरून ठिकठिकाणी पीपीई किटची व्यवस्थाही केलेली आहे.
मात्र, या किटची मागणी आतापर्यंत तरी एकाही परीक्षार्थीने नोंदवली नाही. तरीदेखील परीक्षा केंद्रांवर त्याची व्यवस्था केली आहे, असे निवासी उपजिल्हाधिकारी शिवाजी पाटील यांनी ‘लोकमत’ला सांगितले. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर परीक्षेसाठी नेमण्यात आलेल्या कर्मचाऱ्यांची आरटीपीसीआर चाचणी करण्यात आल्याची ही माहिती अधिकाऱ्यांनी दिली असून विद्यार्थ्यांसाठी ही एसओपी जाहीर करण्यात आल्या आहेत. याशिवाय लोकसेवा आयोगाच्या आदेशास अनुसरून ठिकठिकाणी पीपीई किटची व्यवस्थाही केलेली आहे.
विद्यार्थ्यांच्या चिंतेत भर एमपीएससी उमेदवारांसाठी प्रवर्गानुसार कमाल संधीची मर्यादा निश्चित केली असून यापुढे खुल्या प्रवर्गातील उमेदवारांना जास्तीत जास्त ६ वेळा परीक्षा देता येणार आहे. इतर मागास प्रवर्गातील उमेदवारांना जास्तीत जास्त ९ वेळा परीक्षा देता येणार आहे. त्यामुळे विद्यार्थी आणखी चिंतातुर झाले. या पार्श्वभूमीवर मागील वेळी परीक्षा रद्द केल्यानंतर विद्यार्थ्यांच्या संयमांचा उद्रेक झाला आणि दुसऱ्या दिवशीच सरकारकडून परीक्षेचे २१ मार्च रोजी पुनर्नियोजन करण्यात आले.