मुंबई: महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने(MPSC)काही दिवसांपूर्वीच राज्यसेवेची जाहिरात आणली होती. त्यानंतर काल एमपीएससीने महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट-ब संयुक्त पूर्व परीक्षा 2021 ची जाहिरात जारी केली आहे. या परीक्षांच्या पार्श्वभूमीवर राज्यसभा खासदार संभाजी छत्रपती यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून एमपीएससी परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना वाढीव दोन संधी मिळावी अशी मागणी केली आहे.
कोरोनामुळे मागील दोन वर्षांपासून एमपीएससीच्या परीक्षा झाल्या नव्हत्या. पण, कोरोना कमी झाल्याने आयोगाने मागील काही दिवसांमध्ये परीक्षांचा धडाका लावला आहे. एका पाठोपाठ एक जाहीराती आयोगाकडून जारी केल्या जात आहेत. पण, या जाहीरातींमध्ये वय निघून गेलेल्या उमेदवारांना अप्लाय करता येणार नाही. अशा उमेदवारांसाठी सरकारने दोन संधी उपलब्ध करावी, अशी मागणी संभाजी छत्रपती यांनी केली आहे. याबाबत त्यांनी एक पत्रही मुख्यमंत्र्यांना लिहीलंय.
मोठी बातमी! आयोगाकडून महाराष्ट्र दुय्यम सेवा परीक्षेची घोषणा, 666 पदांसाठी जाहिरात
सरकारने मानवतेच्या दृष्टिकोनातून विचार करावा आणि यांना 2 वाढीव संधी उपलब्ध करुन द्याव्यात. यात सर्वात जास्त नुकसान हे खुल्या प्रवर्गातील उमेदवारांचे झाले आहे. देशातील विविध राज्यांनी देखील उमेदवारांच्या हिताचा निर्णय घेऊन त्यांना वाढीव संधी उपलब्ध करुन दिल्या आहेत. 2019-2020 आणि 2020-2021 या 2 वर्षात ज्या उमेदवारांची वयोमर्यादा ओलांडली आहे. अशा उमेदवारांना 2 संधी उपलब्ध करून देण्यात यावी ही विनंती, असे या पत्रात म्हटले आहे.