मुंबई : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने एकूण १७ संवर्गातील ४२० पदांसाठी २०१९ मध्ये घेतलेल्या राज्य सेवा मुख्य परीक्षेचा निकाल जाहीर करण्यात आला आहे. त्यामध्ये उपजिल्हाधिकारी संवर्गात, सर्वसाधारण वर्गवारीतून साताऱ्याचा प्रसाद बसवेश्वर चौगुले याने ५८८ गुण मिळवून प्रथम क्रमांक मिळविला आहे. मागासवर्गीयांतून उस्मानाबादमधील बोर्डा (ता. कळंब) येथील डॉ. रवींद्र आपदेव शेळके तर महिलांमधून अमरावती जिल्ह्यातील पर्वणी पाटील प्रथम आल्या आहेत. बारामती येथील २५ वर्षीय आरती पवार यांनी एनटीबी प्रवर्गात मुलींमध्ये राज्यात प्रथम क्रमांक मिळविला. त्या सध्या बारामती नगरपरिषदेत करनिरीक्षक म्हणून कार्यरत आहेत. निकाल व शेवटच्या उमेदवाराचे कट ऑफ गुण आयोगाने संकेतस्थळावर प्रसिद्ध केले आहेत.फेब्रुवारी २०१९ रोजी झालेल्या राज्य सेवा पूर्व परीक्षेसाठी एकूण ३,६०,९९० उमेदवार बसले होते.शासकीय नोकऱ्यांमध्ये अनाथ मुलामुलींना एक टक्का समांतर आरक्षण देण्यात येईल, असा निर्णय राज्य सरकारने घेतला असला तरी एमपीएससीच्या आज जाहीर झालेल्या निकालात तशी संधी एकालाही मिळाली नाही. यातून ६,८२५ उमेदवार मुख्य परीक्षेसाठी पात्र ठरले. मुख्य परीक्षा १३ ते १५ जुलै २०१९ या कालावधीत घेण्यात आली. गुणपडताळणीसाठी १० दिवसांच्या आत ऑनलाइन अर्ज करायचे आहेत.
कऱ्हाडचा प्रसाद चौगुले एमपीएससीत प्रथम; राज्यसेवा परीक्षेचा निकाल जाहीर
By ऑनलाइन लोकमत | Published: June 20, 2020 6:17 AM