मुंबई : कोल्हापूरसह राज्यातील इतर शहरांत उद्भवलेल्या पूरस्थितीमुळे एमपीएससीची (महाराष्ट्र लोकसेवा आयोग) परीक्षा दोन आठवड्यांनी पुढे ढकलण्यात आली आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात येणारी महाराष्ट्र दुय्यम सेवा मुख्य परीक्षा (एसटीआय - मुख्य परीक्षा) ११ ऑगस्ट रोजी होणार होती. मात्र, आता २४ ऑगस्ट रोजी ती घेण्यात येणार आहे. त्यामुळे एमपीएससी परीक्षा देणाऱ्या विद्यार्थांना मोठा दिलासा मिळाला आहे.कोल्हापूर, सांगली, कराड, पुणे आणि नाशिकमध्ये गेल्या आठवडाभरापासून पूरस्थिती आहे. पुरामुळे जनजीवन विस्कळीत झाले असून शाळा आणि कॉलेजला सुट्टी देण्यात आलेली आहे. महापुराची तीव्रता वाढीस लागली असताना बचाव कार्यानेही वेग घेतला आहे. पूरग्रस्तांना सुरक्षितस्थळी हलवण्यालाच सर्वोच्च प्राधान्य आहे. त्यामुळे राज्यातील पूरस्थिती पाहता सरकारने ११ ऑगस्ट रोजी होणारी एमपीएससीची परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे. सरकारच्या या निर्णयामुळे पूरग्रस्त भागातील एमपीएससी परीक्षा देणाºया विद्यार्थांना मोठा दिलासा मिळाला आहे.विद्यार्थ्यांनी केली होती विनंतीकोल्हापूर, सांगली, सातारा आणि राज्यातील इतर जिल्ह्यांत पूर परिस्थिती निर्माण झाल्यामुळे अनेक विद्यार्थ्यांनी परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडे केली होती. अखेर त्यांची विनंती मान्य करण्यात आली असून लवकरच नवे हॉलतिकीट संकेतस्थळावर अपलोड केले जाईल. उमेदवाराने प्रत्यक्ष परीक्षा सुरू होण्याच्या वेळेपूर्वी किमान दीड तास आधी संबंधित परीक्षा केंद्रावर, तर परीक्षा सुरू होण्यापूर्वी एक तास आधी परीक्षा कक्षातील स्वत:च्या बैठक क्रमांकावर उपस्थित राहणे बंधनकारक आहे. तसेच परीक्षेला येताना मूळ ओळखपत्र पुरावा म्हणून आवश्यक आहे.
पूरस्थितीमुळे एमपीएससी परीक्षा पुढे ढकलली
By ऑनलाइन लोकमत | Published: August 10, 2019 2:55 AM