मुंबई : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचा (एमपीएससी) कारभार सध्या प्रभारी अध्यक्ष आणि एक सदस्य अशा दोन खांबी तंबूवरच सुरू आहे. सहा महिन्यांपासून अशीच परिस्थिती असल्याने आयोगाच्या कामकाजाला त्याचा फटका बसत आहे.आयोगाचे पूर्णवेळ अध्यक्ष व्ही. एन. मोरे यांचा कार्यकाळ गेल्या मे मध्ये संपला. १ जूनपासून चंद्रशेखर ओक यांच्याकडे प्रभारी अध्यक्षपद आले. पूर्णवेळ अध्यक्ष देण्याची तसदी राज्य सरकारने तेव्हापासून घेतलेली नाही.याशिवाय शैला अपराजित, हमीद पटेल, ज्ञानेश्वर राजूरकर या सदस्यांचा कार्यकाळ संपला तरीही त्यांच्या जागी कोणालाही नियुक्त करण्यात आलेले नाही. एक अध्यक्ष आणि पाच सदस्य एमपीएससीमध्ये असतात. सध्या एक प्रभारी अध्यक्ष व एक सदस्य यांच्या भरवशावर कामकाज सुरू आहे. त्यामुळे मुलाखती घेण्यासाठी हे दोघेच राज्यभर फिरत असतात.राज्य सरकारची मेगा कर्मचारी भरती लवकरच सुरू होणार आहे. अशावेळी तरी आयोग पूर्ण क्षमतेने चालविणे आवश्यक असल्याचे जाणकारांचे म्हणणे आहे. मोरे यांच्या कार्यकाळात एक अध्यक्ष आणि पाच सदस्य अशी स्थिती काही काळ होती.सी-सॅटचा फेरविचार करणारएमपीएससीच्या पूर्वपरीक्षेत सी-सॅटचा पेपर रद्द करावा, अशी मागणी महाराष्ट्र राज्य स्पर्धा परीक्षा संघर्ष समितीने सोमवारी मुख्यमंत्र्यांना भेटून केली होती. हा पेपर रद्द करण्याबाबत एमपीएससी फेरविचार करणार आहे. त्यासाठी तज्ज्ञांची समिती नेमून तिच्या शिफारशीच्या आधारे निर्णय घेण्यात येईल, असे ओक यांनी स्पष्ट केले.प्रभारी अध्यक्ष म्हणून मी आणि सदस्य दयानंद मेश्राम असे दोघेकामाचा भार वाटून घेत आहोत. आयोगाच्या कामावर आम्ही परिणाम होऊ दिलेला नाही, पण आणखी एका सदस्याची लगेच नियुक्ती झाली, तर आयोगाचे काम अधिक सुकर व परिणामकारक होण्यास मदत होईल.- चंद्रशेखर ओक, प्रभारी अध्यक्ष, एमपीएससी
एमपीएससी दोन खांबांच्या तंबूवर; सहापैकी चार सदस्यच नाहीत
By यदू जोशी | Published: November 21, 2018 2:02 AM