MPSC चा पुन्हा सावळा गोंधळ, चाचणीत मनमानी बदल - अतुल लोंढे

By ऑनलाइन लोकमत | Published: April 3, 2023 03:04 PM2023-04-03T15:04:03+5:302023-04-03T15:04:31+5:30

अचानक केलेल्या बदलाला विद्यार्थ्यांचा विरोध असून आयोगाने आपला कारभार सुधारून विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी चालवले खेळ थांबवावा, असे आवाहन अतुल लोंढे यांनी केले आहे.

MPSC's confusion again, arbitrary changes in the test - Atul Londhe | MPSC चा पुन्हा सावळा गोंधळ, चाचणीत मनमानी बदल - अतुल लोंढे

MPSC चा पुन्हा सावळा गोंधळ, चाचणीत मनमानी बदल - अतुल लोंढे

googlenewsNext

मुंबई : महाराष्ट्र लोकसेवा आयोग विद्यार्थ्यांच्या हितासाठी आहे की त्यांच्या भवितव्याशी खेळण्यासाठी आहे हा प्रश्न उपस्थित होत आहे. आयोगाचा कारभार तुघलकी पद्धतीने सुरु असून यात विद्यार्थ्यांचा नाहक छळा होत आहे. लिपिक आणि कर सहायक पदासाठी कौशल्य चाचणी परीक्षा सुरु करण्याआधी काही दिवस त्यात बदल करण्याचा उद्योग आयोगाने केला आहे. अचानक केलेल्या बदलाला विद्यार्थ्यांचा विरोध असून आयोगाने आपला कारभार सुधारून विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी चालवले खेळ थांबवावा, असे आवाहन महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे यांनी केले आहे.

यासंदर्भात माहिती देताना अतुल लोंढे म्हणाले की, एमपीएससी आयोगाचा नवीन अभ्यासक्रमाचा घोळ नुकताच मिटला असताना पुन्हा एकदा आयोगाने आपली मनमानी केली आहे. १६ नोव्हेंबर २०२१ रोजी आयोगाने इथून पुढे होणाऱ्या लिपिक आणि कर सहायक संवर्गाकरीता टायपिंग कौशल्य चाचणी घेणार असल्याबाबत परिपत्रक जाहीर केले. त्यामध्ये मराठी ३० आणि इंग्रजी ४० साठी लागणाऱ्या गतीचा उल्लेख तसेच त्रुटी मोजण्याची पद्धत आणि प्रमाण यांचा समावेश आयोगाने केला. 

पूर्व आणि मुख्य परिक्षेनंतर पात्र विद्यार्थ्यांनी कौशल्य चाचणीसाठी या प्रसिद्धी पत्रकावर विश्वास ठेवून टायपिंग चाचणीसाठी सराव केला. परंतु परीक्षा सुरु होण्याच्या काही दिवस अगोदरच नविन प्रसिद्धीपत्रक काढून १६ नोव्हेंबर २०२१ रोजी जाहीर केलेल्या परिपत्रकातील मुद्यांना हरताळ फासला. नवीन प्रसिद्धीपत्रकामध्ये आयोगाने टायपिंग करावयाच्या उताऱ्याच्या लांबीसोबतच आवश्यक गतीमध्ये वाढ करणाऱ्या नवीन सूचना प्रसिद्ध केल्या. टायपिंगसाठी मॉक लिंक ही उपलब्ध करुन देताना आयोगाने मराठी कीबोर्ड न देता हिंदी कीबोर्ड दिला आहे. याचा परिणाम गतीवर होणार असल्याने विद्यार्थ्यांचे नुकसान होणार आहे, असे अतुल लोंढे म्हणाले.

परीक्षा समोर असतानाच नवीन नियम काढण्याची आयोगाची ही सवय काही नवीन नाही. अलिकडच्या काळात वाढत्या कोर्ट केसेसचे प्रमाण आणि सारखे बदलावे लागणारे नियम हे याचेच परिणाम आहेत. परंतु या सर्व प्रक्रियेदरम्यान सामान्य विद्यार्थी भरडला जातो, याची दखल राज्य शासनाला आणि पर्यायाने आयोगाला घ्यावी लागेल. नवीन परिपत्रकामुळे विद्यार्थी भयानक तणावात व गोंधळलेले आहेत. याबाबत आयोगाने नवीन प्रसिद्धीपत्रक काढत वरील सर्व अडचणींना विराम द्यावा व विद्यार्थ्यांवरील अन्याय दूर करावा, असे अतुल लोंढे यांनी म्हटले आहे.

एमपीएससी ही स्वायत्त संस्था आहे म्हणजे मनमानी कारभार करण्याची त्यांना मुभा आहे असा त्यांचा ग्रह झाला आहे काय? तसे असेल तर तो त्यांनी दूर करावा. विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळण्याचा आयोगाला अधिकार नाही. आयोगाने आपल्या मनमानी व लहरी कार्यपद्धतीत बदल करावा अन्यथा संतप्त विद्यार्थ्यांच्या उद्रेकाला तोंड द्यावे लागले, असेही लोंढे म्हणाले.

Web Title: MPSC's confusion again, arbitrary changes in the test - Atul Londhe

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.