मुंबई : एमपीएससीची तयारी करणाऱ्या राज्यातील लाखो विद्यार्थ्यांच्या लढ्यापुढे अखेर सरकार झुकले असून नवा अभ्यासक्रम २०२५ पासून लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. काँग्रेस पक्ष या निर्णयाचे स्वागत करत असून हा विद्यार्थ्यांच्या एकजुटीचा विजय आहे. भाजपने याचे फुकटचे श्रेय घेण्याचा प्रयत्न करू नये असे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस व मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे म्हणाले.
या संदर्भात अतुल लोंढे म्हणाले की, नव्या अभ्यासक्रमाची अंमलबजावणी २०२५ या वर्षापासून करावी अशी राज्यभरातील लाखो विद्यार्थ्यांची मागणी होती. गेल्या काही महिन्यांत विद्यार्थ्यांनी या मागणीसाठी अनेकवेळा आंदोलनेही केली होती. काँग्रेस पक्षाने विद्यार्थ्यांच्या या मागणीला सुरुवातीपासूनच पाठिंबा दिला होती. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी नागपूरच्या हिवाळी अधिवेशनात हा मुद्दा लावून धरत यासंदर्भात सरकारला विनंती केली होती. पण सरकारने आडमुठेपणाची भूमिका घेत निर्णय घेण्याचे टाळले होते. त्यानंतर १३ जानेवारी रोजी काँग्रेस पक्षातर्फे पुणे, नागपूर, औरंगाबाद, कोल्हापूर या शहरांसह संपूर्ण राज्यभरात एकाच दिवशी आंदोलन करण्यात आले होते.
पुण्याच्या अलका टॉकीज चौकात हजारो विद्यार्थ्यांसह सकाळी १० वाजल्यापासून पहाटे चार वाजेपर्यंत मी स्वतः आंदोलन केले होते. त्यादिवशी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे दोघेही पुणे शहरात होते पण त्यांनी आंदोलनकर्त्या विद्यार्थ्यांची साधी भेटही घेतली नाही. त्यानंतरही राज्यभरात विद्यार्थी आक्रमक होऊन आंदोलन करत होते. मी स्वतः पाठपुरावा करून विधानरिषद उपसभापती निलमताई गोऱ्हे यांच्याकडे या संदर्भात पाठपुरावा केला होता. त्यांनी राज्य सरकार आणि एमपीएससीच्या अधिका-यांसोबत बैठका घेतल्या होत्या. विद्यार्थ्यांची मागणीही न्याय्य होती त्यामुळे सरकारपुढे यासंदर्भात निर्णय घेण्याशिवाय पर्याय राहिला नव्हता.
अखेर विद्यार्थ्यांच्या एकजुटीपुढे सरकारला झुकावे लागले आणि त्यांनी हा निर्णय घेतला. पण या निर्णयाचे श्रेय घेण्यासाठी भारतीय जनता पक्षाने अभिमन्यू पवार आणि गोपीचंद पडळकर यांना पुढे करून निर्णय घेण्यापूर्वी विद्यार्थ्यांना पुन्हा आंदोलन करायला लावले. विद्यार्थ्यांच्या आंदोलनाचे फुकटचे श्रेय घेण्याचा अश्लाघ्य प्रयत्न भाजपने केला असा टोला अतुल लोंढे यांनी लगावला.