पंढरपूर : आषाढी यात्रेनिमित्त पंढरपूरात लाखावर भाविक येत असून त्यांच्या दर्शनात विलंब लागू नये, श्री विठ्ठल-रूक्मिणी मातेचे दर्शन घेऊ इच्छिणाºया प्रत्येक भाविकाला दर्शन घेता यावे, या उद्देशाने श्री विठ्ठल-रूक्मिणी मंदिर समितीने भाविकांच्या सोयीसाठी आज गुरुवारी देवाचा चांदीचा पलंग काढून दर्शनासाठी मंदिर २४ तास खुले करण्यात आले आहे.
पंढरपूरची सर्वात मोठी यात्रा असलेल्या आषाढी यात्रेला आषाढ प्रतिपदेपासून सुरवात झाली. आषाढ द्वितीयेला शुभ दिवसाचा मुहूर्त पाहून ०४ जुलै रोजी सकाळी ११ वाजता श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी सचिन ढोले यांच्या हस्ते विधिवत पूजा करण्यात आली.
विठुरायाचे नवरात्र सुरू होत असल्याने देवाच्या विश्रांतीचा चांदीचा पलंग या नवरात्री काळात काढण्याची परंपरा असल्याने विधिवत पूजा करून हे नवरात्र बसविण्यात आले. आज सकाळी देवाच्या पूजेनंतर देवाच्या मागे आणि रुक्मिणी मातेच्या पाठीला मऊ कापसाचा लोड लावण्यात आला असून आता २४ तास दर्शनासाठी उभ्या असलेल्या विठुरायाला थकवा जाणवू नये, यासाठी ही व्यवस्था करायची परंपरा आहे.
सकाळी देवाच्या शेजघरातील पलंग बाहेर काढण्यात आला. यावेळी या चांदीच्या पलंगावरील देवाच्या गाद्या गिरद्या देखील बाहेर काढून ठेवण्यात आल्या. देवाचे शेजघर मोकळे करून ठेवण्यात आले. आजपासून देवाचे सर्व राजोपचार बंद करून देव फक्त भाविकांच्या दर्शनासाठी सज्ज झाला आहे.
देवाचे दर्शन २४ तास खुले केल्याने आता दररोज पायावर ५० हजार तर मुखदर्शनातून ५० ते ६० हजार भाविकांना दर्शन मिळू शकणार आहे. यात्रा संपल्यानंतर प्रक्षाळपुजा होईल व त्यानंतर देवाला पुन्हा एकदा शयनकक्षात नेण्यात येईल व देवाचे नित्योपचारही पुन्हा सुरु होणार असल्याची माहिती व्यवस्थापक बालाजी पुदलवाड यांनी दिली.
त्याप्रसंगी मंदिर समितीचे व्यवस्थापक बालाजी पुदलवाड, लेखाधिकारी सुरेश कदम, इतर कर्मचारी उपस्थित होते.
असे असतील विठुरायाचे नित्यक्रमपहाटे ४.३० वाजता देवाचे स्नान आणि नित्यपूजा करण्यात येईल. या काळात फक्त १ तास दर्शन बंद असेल. यानंतर दुपारी महानैवेद्याला १५ मिनिटे आणि रात्री ९ वाजता लिंबू पाणी देण्यासाठी १५ मिनिटे दर्शन थांबविण्यात येणार आहे. याशिवाय संपूर्ण दिवस-रात्र विठुराया आपल्या लाडक्या भक्तांना दर्शन देत उभा असणार आहे.