अकोला : राज्यात कृषी अभ्यासक्रमाकडे विद्यार्थ्यांचा कल वाढत असून, यंदा राज्यातील १४,३५६ विद्यार्थ्यांंनी रविवार, १२ जुलै रोजी एमएससी कृषी प्रवेशासाठी एकाचवेळी सीईटी परीक्षा दिली आहे. राज्यात डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला, महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी जि. अहमदनगर, स्व.वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी व डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ, दापोली जि. रत्नागिरी हे चार कृषी विद्यापीठ असून, या विद्यापीठांची विविध कृषी अभ्यासक्रमाची महाविद्यालये आहेत. तसेच संलग्नित खासगी कृषी महाविद्यालय आहेत. आधी कृषी अभ्यासक्रमाची बीएससी पदवी घेतल्यानंतर, थेट एमएससी कृषी या पदव्युत्तर अभ्यासक्रमाला प्रवेश दिला जात होता. पण गत पाच वर्षांपासून यामध्ये बदल करण्यात आला असून, एमएससी कृषी अभ्यासक्रमाला पात्र होण्यासाठी प्रवेशपूर्व परीक्षा (सीईटी) घेण्यात येत आहे. या परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांंनाच एमएससीला प्रवेश दिला जात असल्याने या परीक्षेसाठी स्पर्धा निर्माण झाली आहे. राज्यात यंदा १४,३५६ विद्यार्थी या परीक्षेला बसल. यात सर्वाधिक एमएससी कृषी या विषयात ८,४४२ विद्यार्थ्यांंनी ही परीक्षा दिली. उद्यानविद्याशास्त्र या अभ्यासक्रमाची निवड केलेल्या २,६२५ विद्यार्थ्यांंनी परीक्षा दिली. वनशास्त्र २५४, कृषी अभियांत्रिकी २५४, अन्न तंत्रज्ञान ३00, गृह विज्ञान ११, मत्स्यशास्त्र ४९, जैवतंत्रज्ञान ७११, कृषी व्यवसाय व्यवस्थापन १,४0२ तर कापणीपश्चात तंत्रज्ञान अभ्यासक्रमासाठी २९८ विद्यार्थी परीक्षेला बसले होते. या सीईटी परीक्षेत उत्तीर्ण विद्यार्थ्यांंना गुणवत्तेनुसार प्रवेश व महाविद्यालय मिळणार आहे. त्यामुळे चांगले महाविद्यालय मिळावे, यासाठी विद्यार्थ्यांंमध्ये स्पर्धा आहे.
*परीक्षा पर्यवेक्षक बदलले
यंदा चारही कृषी विद्यापीठांचे परीक्षा पर्यवेक्षक बदलले असून, अकोल्याच्या कृषी विद्यापीठाचे शास्त्रज्ञ, प्राध्यापक मराठवाड्यात या प्रमाणे बदल करण्यात आले आहेत.