लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : कोरोना काळात वीज ग्राहकांना भरघोस आलेल्या वीजबिलांबाबत सवलत मिळण्याची शक्यता कमी आहे. कारण महावितरणने वीजबिल वसुलीसंदर्भात परिपत्रक जारी केले आहे. परिणामी, बिलातील सवलतीची शक्यता मावळली असून, वीजबिल वसुलीचे निर्देशही महावितरणने दिले आहेत. या संदर्भातील मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत.
सर्व थकबाकी आणि चालू वीजबिल डिसेंबर, २०२० पर्यंत वसूल करण्यात यावे, असे निर्देश देण्यात आले आहेत. १ एप्रिलपासून ६४.५२ लाख लघुदाब ग्राहकांनी वीजबिलपोटी कोणतीही रक्कम आजपर्यंत भरलेली नाही. परिणामी, अडचणी येत आहेत, असे महावितरणचे म्हणणे आहे. परिणामी, थकबाकी वसुली मिशन मोडमध्ये सर्व स्तरावर करायची आहे. प्रत्येक अधिकारी आपल्या कार्यक्षेत्रात वसुलीच्या प्रगतीवर लक्ष ठेवणार आहे.
बिल टप्प्याटप्प्याने भरण्यासाठी नव्या धोरणाला मंजुरी दिली आहे. ऑनलाइन वीजबिल भरण्याबाबत ग्राहकांना माहिती द्यावी. जास्त थकबाकी असणाऱ्या ग्राहकांना भेट देत बिलाचा भरणा करून घ्यावा. थकबाकी आणि चालू वीजबिल वसूल करण्यासाठी, वीज विक्री वाढविण्यासाठी सर्व संभाव्य बाबी करण्यात याव्यात. वीजबिले कशी योग्य आहेत, हे ग्राहकांना समजवून सांगावे, अशी सूचना महावितरणने कर्मचाऱ्यांना केली आहे.
कॅश फ्लो सुधारण्यासाठी थकबाकी, तसेच चालू वीजबिल वसुली सुरू करणे आवश्यक आहे. वसुली मोहीम राबविताना अखंडित पुरवठा करण्यासाठी केलेले प्रयत्न ग्राहकांच्या निदर्शनात आणून द्यावे. ग्राहकांना स्पष्ट करावे की, अडचणींमुळे संचलन, सुव्यस्थेसाठी लागणाऱ्या खर्चाची पूर्तता करणे कठीण झाले आहे. परिणामी, वीजपुरवठा करण्याच्या प्रयत्नावर परिणाम होऊ शकतो, असे महावितरणने स्पष्ट केले
प्रत्यक्ष जागेवर जाऊन हाेणार मीटर वाचनग्राहकांच्या प्रत्येक जागेवर जाऊन मीटर वाचन, वीजबिल छपाई, वीजबिल वाटप सुरू होणार आहे. बिलाच्या वसुलीसाठी मेळावे घेण्यात येतील. ग्राहकांना टप्प्याटप्प्याने वीजबिल भरण्याची सुविधाही देण्यात येणार आहे.