मुंबई : महानिर्मिती आणि अदानी या दोन्ही वीजनिर्मिती कंपन्यांनी महावितरणला अधिकची वीज उपलब्ध करून देण्याची ग्वाही दिली असली तरीदेखील मागणी पुरवठ्यातील फरकामुळे भविष्यातही महाराष्ट्राला भारनियमनाला सामोरे जावे लागेल.
महावितरणला महानिर्मितीकडून साधारण ६ हजार ८०० मेगावॉटपर्यंत वीज मिळत होती. ती ७ हजार ५०० मेगावॉटपर्यंत मिळणार आहे. अदानी पॉवर कंपनीकडून १ हजार ७०० मेगावॉटवरून २ हजार २५० मेगावॉट वीजपुरवठा उपलब्ध होत आहे. शुक्रवारी मध्यरात्रीपासून ३ हजार ११ मेगावॉट वीज उपलब्ध होईल. उपलब्धतेनुसार मागणी व पुरवठा यातील तूटी कमी झाल्यास भारनियमन टप्प्याटप्प्याने कमी करता येईल. परिणामी, वीज संकटात नागरिकांना दिलासा मिळणार आहे.
राज्यातील दोन कोटी ८० लाख ग्राहकांना वीजपुरवठा करण्यासाठी सार्वजनिक व खासगी कंपन्यांकडून वीज खरेदी केली जाते. तापमानाच्या वाढत्या पाऱ्यात कोळसा टंचाई व वाढलेल्या मागणीमुळे सुरू झालेले विजेचे भारनियमन कमीत कमी करून वीजग्राहकांना दिलासा देण्यासाठी अतिरिक्त वीज उपलब्ध करण्याच्या प्रयत्नांना यश येत आहे.- महावितरण
मागणी प्रचंड वाढलीवाढते तापमान व विजेच्या वापरात वाढ यामुळे मुंबई वगळता उर्वरित महाराष्ट्रात विजेची २४,५०० ते २५ हजार मेगावॉट मागणी राहिली. खरेदीचा करार केलेल्या कंपन्यांकडून कोळसा टंचाई तसेच इतर तांत्रिक कारणांमुळे वीज कमी मिळत असल्याने २,३०० ते २,५०० मेगावॉट विजेची तूट निर्माण झाली होती. परिणामी, भारनियमन होत होते.