जळगाव-
कोरोनाच्या संकटानंतर आता शाळा सुरू झाल्या आहेत. गरीबांसाठी एसटी हे वाहतुकीचे सर्वात मोठे साधन आहे. त्यामुळे माझी एसटी कर्मचाऱ्यांना कळकळीची विनंती आहे आहे की त्यांनी कमावर रुजू व्हावं, असं आवाहन राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केलं आहे. ते आज जळगावमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते.
"एसटी कर्मचारी देखील आपलेच आहेत. पण त्यांनी असं हट्टाला पेटणं बरोबर नाही. प्रवासी देखील आपलेच आहेत. यामध्ये समजूतदार भूमिका घेणं आवश्यक आहे. माझी विनंती आहे की तुम्ही आता टोकाची भूमिका घ्यायला लावू नका. आता सहनशीलता संपत आली आहे. सहनशीलतेचा अंत कुणी पाहू नये. त्यामुळे एसटी कर्मचाऱ्यांनी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी कामावर रुजू व्हावं अशी माझी विनंती आहे", असं अजित पवार म्हणाले.
एसटी सुरू झाल्यानंतर बसेसवर झालेल्या हल्ल्याचाही त्यांनी निषेध व्यक्त केला. राज्यात अनेक ठिकाणी एसटी सुरू झाल्यानंतर दगडफेक केली गेली. पण हे जनतेचंच नुकसान आहे. काहीजण नोकरीला येत आहेत. उद्या मेस्मासारखा टोकाचा निर्णय घ्यावा लागला तर काय होईळ. तुटेपर्यंत ताणणाऱ्या संपाचं काय झालं हे आपण पाहिलं आहे. कुणी ऐकायलाच तयार नसेल तर नवीन भरती सुरू केली आणि नोकरीचा प्रश्न येणार की नाही तुम्हीच सांगा. मंत्रिमंडळात चर्चा झाली आहे. टोकाची वेळ येऊ देऊ नका, असंही अजित पवार स्पष्टपणे म्हणाले.
"माझी आता आग्रहाची विनंती आहे. आता मानधन बऱ्यापैकी वाढवलं आहे. आजूबाजूच्या राज्यांएवढं दिलं आहे. पगार कमी होता की गोष्ट खरी आहे. पण आता पगार वाढवला आहे. तसंच पगाराच्या वेळेबाबतचाही निर्णय झाला आहे. अनिल परब यांनी शब्द दिला आहे आणि आम्हीही त्याला बांधिल आहोत. त्यामुळे आता टोकापर्यंत जाण्याची वेळ येऊ देऊ नका", असं अजित पवार म्हणाले.