मुंबई : राज्य सरकारच्या कर्मचाऱ्यांना येत्या २९ फेब्रुवारीपासून पाच दिवसांचा आठवडा करण्याचा निर्णय आज सरकारने घेतला आहे. मात्र या निर्णयावर सरकारमधील मंत्री बच्चू कडू यांनी जोरदार टीका केली होती. त्यांनतर आता राष्ट्रवादीचे नेते अमोल मिटकरी यांनी यावर आपली भूमिका मांडताना "जितकं काम तितकाच पगार" देण्याची मागणी केली आहे.
सरकारी कर्मचाऱ्यांच्या मागणीनुसार पाच दिवसांचा आठवडा करण्यासंबंधीचा प्रस्ताव सरकारच्या विचाराधीन होता. त्यानुसार, दररोज कामाची ४५ मिनिटे वाढवून 5 दिवसांचा आठवडा करण्याचा निर्णय करता येईल, अशी भूमिका मुख्यमंत्रीउद्धव ठाकरे यांनी गेल्या मंगळवारी राजपत्रित अधिकारी महासंघाच्या पदाधिकाऱ्यांसह झालेल्या बैठकीत मांडली होती. त्यानंतर, आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत 5 दिवसांचा आठवडा करण्यास मंजुरी देण्यात आली आहे.
मात्र या निर्णयावर प्रतिक्रिया देताना मिटकरी यांनी वेगळी भूमिका घेतली आहे. "जितकं काम तितकाच पगार असावा. सरकारी कामकाज करणाऱ्यांमध्ये पोलीस पण येतात, त्यांचा व शेतकऱ्यांचा कामाचा ताण कमी होईल असा एखादा निर्णय होणे गरजेचे. तसेच कामकाज पाच दिवस तर पगार पण पाचचं दिवसाचाचं दिला पाहिजे, अशी मागणी मिटकरी यांनी केली आहे. तर हे माझे वैयक्तिक मत असल्याचे सुद्धा ते म्हणाले.