- अरुण पवार (पाटण, जि. सातारा)
कऱ्हाड तालुक्यातील साजूर गावाला उसाचा वेढा पडला असला तरी येथील देवीदास चव्हाण या शेतकऱ्याने धाडसाने वेगवेगळी पिके घेण्यास सुरुवात केली. आता तर या शेतकऱ्याने दुधी भोपळा या वेलीवरच्या पिकाची लागण केली. येत्या महिनाभरात उत्पादन सुरू होऊन दर मिळाला तर महिन्याला दोन लाखांचे उत्पन्न मिळणार असल्याचा दावा त्यांनी केला आहे.
कऱ्हाड आणि पाटण तालुक्याच्या सीमेवर वसलेल्या साजूर या गावाला वेढा पडला आहे तो नगदी पीक असलेल्या उसाचा. जिकडे पाहावे तिकडे ऊसच ऊस; पण याच गावातील एक शेतकरी देवीदास चव्हाण हे आपल्या जिद्दीच्या जोरावर धाडस करून गेल्या अनेक वर्षांपासून वेगवेगळी बागायती पिके घेऊन लाखो रुपये कमवत आहेत. सध्या या शेतकऱ्याने आपल्या पत्नीच्या पाठबळावर दुधी भोपळा या वेलीवरच्या पिकाची लागण केली आहे. येत्या महिनाभरात दुधी भोपळ्यातून प्रत्यक्ष उत्पन्न येण्यास सुरुवात होणार आहे. त्यानंतर यापुढे वर्षभर सतत छाटणी करून दर महिन्यास सुमारे दोन लाखांचे उत्पन्न मिळणार आहे.
विशेष म्हणजे देवीदास चव्हाण यांचे शिक्षण फक्त दहावीपर्यंत झाले आहे. वडिलानंतर देवीदास यांनी शेतीत पाऊल टाकल्यावर गेली २२ वर्षे मागे वळून न पाहता आपली घोडदौड चालू ठेवली आहे. देवीदास चव्हाण आणि त्यांची पत्नी आशा यांनी आपल्या ७० गुंठे कसदार शेतजमिनीत नवनवीन बागायती पिके घेण्याचा सपाटा लावला आहे. सकाळी पहाटे उठून शेतात जायचे ते संध्याकाळी दिवस मावळला की शेत सोडायचे. कधी-कधी सणवार, गावातील उत्सव किंवा लग्न या कार्यक्रमांकडे पाठ फिरविली; पण शेतीकडे लक्ष दिले. आतापर्यंत अपार कष्ट केले. तसेच पिकांसाठी ठिबक सिंचन करून त्या जोरावर या दोघांनी टोमॅटो, मलची मिरची, बिनीज काकडी, ब्रोकली आदी नावीन्यपूर्ण बागायती पिके घेऊन लाखो रुपये कमविले आहेत.
आता तर दुधी भोपळा हे पीक घेण्यास त्यांनी सुरुवात केली असून, एका शेतातील दुधी भोपळे बाजारात जाऊ लागले आहेत. पुणे, मुंबई, सातारा, कऱ्हाड आणि बेळगाव याठिकाणी साजूरच्या दुधी भोपळ्यास मागणी आहे. यावर्षी ८० टन दुधी भोपळा निर्यात करण्यात येईल, असा विश्वास देवीदास चव्हाण यांनी बोलून दाखविला आहे. दुधी भोपळा लागवडीस आतापर्यंत ४० हजार रुपये खर्च आला आहे. यामध्ये कीटकनाशक फवारणी, खत आणि मशागत यांचा खर्च आहे. स्वत:ची विहीर असून, त्या आधारावर ठिबक सिंचन केले आहे. दुधी भोपळ्यापासून उत्पन्न भरपूर मिळते. मात्र, अतिपाऊस या पिकाला चालत नाही. बाजारभावात चढ-उतार झाला तर नुकसान होते. मागणी वाढली तर दुधी भोपळ्यापासून येत्या सहा महिन्यांत पाच लाखांचे उत्पन्न मिळेल, असा विश्वासही चव्हाण यांनी व्यक्त केला.