खोडद : सन २०१०मध्ये प्रधान मंत्री ग्रामसडक योजनेंतर्गत काम झालेल्या नारायणगाव -खोडद रस्त्याची दुरवस्था झाली होती. या रस्त्याच्या कामाची तसेच दुरवस्थेबाबत ‘लोकमत’ने वारंवार वृत्त दिले आहे. याची दखल घेत सार्वजनिक बांधकाम विभागाने या रस्त्याच्या दुरुस्तीच्या कामाला सुरुवात केली आहे. यामुळे नागरिकांची गैरसोय दूर होणार आहे. प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेंतर्गत या रस्त्याचे काम झाल्यानंतर सन २०१५ पर्यंत या रस्त्याचा दोषदायित्व कालावधी होता. मात्र २०१५नंतर हा रस्ता जुन्नर सार्वजनिक बांधकाम विभागाकडे वर्ग करण्यात आला आहे. मागील काही दिवसांत या रस्त्याची खूपच दुरवस्था झाली होती. जागतिक दर्जाच्या जीएमआरटी प्रकल्पाला जोडला जाणारा प्रमुख मार्ग असणारा व प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेंतर्गत झालेला नारायणगाव-खोडद रस्त्याची अक्षरश: चाळण झाल्याने या रस्त्यावरून प्रवास करणे धोक्याचे झाले होते. या रस्त्यावरील असणारे खड्डे हे सध्या सार्वजनिक बांधकाम विभागाकडून होणाऱ्या दुरुस्तीच्या प्रतीक्षेत होते. सार्वजनिक बांधकाम विभागाने या रस्त्याच्या दुरुस्तीचे काम तत्काळ सुरु करावे अशी मागणी खोडद आणि हिवरे ग्रामस्थांनी अनेकवेळा केली होती. याबाबत ‘लोकमत’ने सतत पाठपुरावा केल्याने या रस्त्याच्या दुरुस्तीला अखेर मुहूर्त मिळाला. या रस्त्याच्या दुरुस्तीचे काम सार्वजनिक बांधकाम विभागाकडून सुरु झाल्याने खोडद व हिवरे गावच्या नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे. नारायणगाव-खोडद रस्त्याच्या साईडपट्ट्यादेखील वाहून गेल्याने रस्त्याच्या कडेला मोठमोठे खड्डे तयार झाले आहेत. या खड्ड्यांमुळे अपघातांचा धोका आहे. या साईडपट्ट्यांची दुरुस्ती करण्याची मागणी नागरिक करत आहेत. (वार्ताहर)>साईडपट्ट्याही दुरुस्त कराजीएमआरटी प्रकल्पाला जोडल्या जाणाऱ्या अन्य ७ रस्त्यांचेही रुंदीकरण व मजबुतीकरण करण्याच्या सूचना संबंधित विभागाला देण्यात याव्यात, अशी मागणी खोडदचे सरपंच विजय गायकवाड यांनी जिल्हाधिकारी सौरभ राव व जुन्नर सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता जी. बी. पोहेकर यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
खोडद रस्त्याच्या दुरुस्तीला मिळाला मुहूर्त
By admin | Published: January 20, 2017 12:47 AM