डिप्पी वांकाणी, मुंबईशीना बोरा हत्याकांडाने सोमवारी नवे वळण घेतले. शीना बोराची हत्या झाल्यानंतर वर्षभराने पीटर व इंद्राणी मुखर्जी यांनी शीनाचा ठावठिकाणा शोधण्यास मदत करा म्हणून २०१३ मध्ये भारतीय पोलीस सेवेतील (आयपीएस) अधिकारी देवेन भारती यांची भेट घेतली होती. देवेन भारती म्हणाले की, यावर्षी आॅगस्ट महिन्यात प्रथम माहिती अहवाल (एफआयआर) दाखल झाल्यानंतर मी माझ्या पथकातील सहकाऱ्यांना, त्याच दिवशी पीटर २०१३मध्येच काही तरी संशयास्पद भूमिका बजावतोय, असे सांगितले होते. शीनाच्या खुनाचा गुन्हा दाखल झाल्यानंतर पीटर मुखर्जीला मग ताबडतोब अटक का झाली नाही, असा प्रश्न सध्या चर्चेत आहे.ते दोघे मला व्यक्तिश: भेटले नाहीत. परंतु शीना बेपत्ता असल्यामुळे तिचा ठावठिकाणा शोधण्यात लक्ष घाला, असे ते दूरध्वनीवर माझ्याशी बोलले होते. हे काम मी माझ्या अधिकाऱ्याकडे सोपविले. त्याने मला तिचा फोननंबर स्वीचड् आॅफ आहे, असे सांगितले. काही दिवसांनी मुखर्जींनी हे प्रकरण आपण बंद करून टाकले पाहिजे, असे सांगितले. आॅगस्टमध्ये आम्ही गुन्हा नोंदवल्यानंतर ही माहिती मी माझ्या पथकाला सांगितली. हे प्रकरण सीबीआयकडे गेल्यानंतर मी हीच माहिती त्यांनाही दिली, म्हणूनच मी या खटल्यात सरकारी साक्षीदार बनलो, असेही देवेन भारती म्हणाले. इंद्राणी मुखर्जीला अटक झाल्यानंतर लगेचच पीटर मुखर्जीला का अटक झाली नाही, असे विचारता भारती म्हणाले की, आम्ही त्याचे ईमेल्स आणि मोबाईल फोनचा तपशील न्यायवैद्यक प्रयोगशाळेला पाठविला होता. त्याचा अहवाल यायच्या आधीच हे प्रकरण सीबीआयकडे हस्तांतरीत झाले होते.
मुखर्जी दाम्पत्याने घेतली होती भारतींची भेट
By admin | Published: November 24, 2015 2:50 AM