सांगवी : उद्यानात सायकलींचा वापर, अपुरी व तुटलेली खेळणी, राडारोडा, ठिकठिकाणी पडलेला पालापाचोळा, वाढलेली झाडे, अस्वच्छ स्वच्छतागृह अशी अवस्था पी. डब्ल्यू. डी. उद्यानाची झाली आहे. सांगवी परिसरात पी. डब्ल्यू. डी. उद्यान आहे. उद्यान छोटे असले, तरी आजूबाजूला लोकवस्ती जास्त असल्याने लहान मुले व ज्येष्ठ नागरिकांची उद्यानात गर्दी असते. उद्यानाची वेळ सकाळी सहा ते दहा व सायंकाळी चार ते आठ अशी आहे. दुपारच्या वेळेतही उद्यान खुले असते. उद्यानात खेळणी अपुरी आहेत. जी खेळणी आहेत, त्यातील काही खेळणी तुटलेली आहेत. त्यामुळे मुलांना खेळण्यासाठी पर्याय नाही. यामुळे वाद निर्माण होतात. तुटलेल्या खेळण्यांपासून दुखापत होण्याची शक्यता आहे, असे नागरिकांनी सांगितले. उद्यानात सुरक्षारक्षक नाही. उद्यानात माळीही नाही. यामुळे पालापाचोळा वाढला आहे. पाण्याच्या अभावाने उद्यानातील गवत वाळले आहे. उद्यानातील तुषारसिंचन अनेक दिवसांपासून बंद आहे. त्याच्या बाजूला पाण्याचे तळे साचले आहे. यामध्ये पाण्याच्या बाटल्या, पिशव्या पडल्या आहेत. साचलेल्या पाण्यामुळे डासांचा प्रादुर्भाव वाढला आहे. त्यामुळे उद्यानातील नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला आहे. उद्यानाच्या प्रवेशद्वाराजवळ आतील बाजूस सायकलचे पार्किंगच तयार झाले आहे. उद्यान आडोशाला असल्याने उद्यानाबाहेर प्रेमी युगुलांचे प्रमाण वाढले आहे. उद्यानात खेळणी बसवावी, सुरक्षारक्षक नेमावा, नियमित साफसफाई करावी, माळी असावा, अशा मागण्या स्थानिक नागरिकांनी केल्या आहेत. (प्रतिनिधी)>उद्यानाच्या आतील डाव्या बाजूस स्वच्छतागृह आहे. अनेक दिवसांपासून ते बंद आहे. त्याचे दरवाजे तुटले आहेत. पाण्याची गैरसोय आहे. अनेक दिवसांपासून ते साफ न केल्याने उद्यानात दुर्गंधी पसरली आहे. यामुळे नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला आहे. पिण्याच्या पाण्यासाठी नळ लावण्यात आले आहेत. मात्र, ते गळत असल्याने नासाडी होत आहे. पावसाच्या पाण्यामुळे खेळण्यांखाली पाणी साचले आहे. खेळणी खेळताना मुलांना कसरत करावी लागत आहे. पदपथाच्या बाजूला असलेले विद्युत खांब तुटले आहेत. त्यावरील दिवे गायब झाले आहेत. बंदी असतानाही आजूबाजूची काही मुले उद्यानात सायकल घेऊन प्रवेश करतात.
पालापाचोळा, अस्वच्छ स्वच्छतागृह
By admin | Published: June 13, 2016 2:05 AM