मुंबई : देवनार डम्पिंग ग्राउंडवरील आगीच्या घटनांचे तीव्र पडसाद उमटत असल्याने अखेर महापालिकेने मुलुंड डम्पिंग ग्राउंड बंद करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे़ त्यासाठी निविदा मागविण्यात आल्या असून आठवडाभरात कामाला सुरुवात होईल, असे आयुक्त अजय मेहता यांनी मंगळवारी स्पष्ट केले़ परंतु देवनार डम्पिंग ग्राउंडबंद करण्याबाबत प्रशासनाने मौन बाळगले आहे़ मुलुंड आणि देवनार डम्पिंग ग्राउंडची मर्यादा संपुष्टात आल्याने येथे कचरा टाकणे तत्काळ बंद करण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने दिले होते़ मात्र कांजूरमार्ग डम्पिंग ग्राउंडचा वाद आणि तळोजा येथे मिळालेल्या नवीन जागेला वेळ लागणार असल्याने कचरा टाकायचा कुठे, असा प्रश्न पालिकेला पडला आहे़ (प्रतिनिधी)>कचऱ्याच्या गाड्यांवर वॉचकचऱ्यामध्येही हातचलाखी दाखवून ठेकेदार पैसा कमवीत असतात़ त्यामुळे पालिकेने कचऱ्याच्या वाहनांचे ट्रॅकिंग सुरू केले आहे़ त्यानुसार कचऱ्याची गाडी किती वाजता कचरा घेऊन निघाली, डम्पिंग ग्राउंडवर किती वाजता पोहोचली, कचऱ्याचे वजन, पावती असा सगळा लेखाजोखाच ठेवण्यात येणार आहेग़ॅस जमा करण्यास सुरुवातदेवनार डम्पिंगवरील कचऱ्याच्या डोंगराखाली मिथेन वायूमुळे कचऱ्याला आग लागत आहे़ यावर आयआयटी आणि निरी या संस्थांचा सल्ला घेऊन पालिकेने गॅस जमा करण्यास सुरुवात केली आहे.
गोवंडीत श्वसनाच्या त्रासाने बालकाचा मृत्यू
मुंबई : देवनार डम्पिंग ग्राउंडला लागलेल्या आगीमुळे परिसरातील रहिवाशांना खोकला व श्वसनाचे त्रास होत असतानाच सोमवारी रात्री या परिसरातील एका ६ महिन्यांच्या चिमुरड्याचा श्वसनाच्या आजाराने मृत्यू झाला. हसनैन सर्फराज खान असे या बालकाचे नाव असून आगीच्या धुरामुळे त्याचा मृत्यू झाल्याचा आरोप नातेवाइकांनी केला आहे.हसनैनला दोन महिन्यांपासून श्वसनाचा त्रास होत होता. त्याच्यावर येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. त्याच्या प्रकृतीमध्ये सुधारणा झाली होती. मात्र रविवारच्या आगीनंतर त्याचा त्रास अधिकच वाढला होता. त्यामुळे त्याच्यावर पुन्हा उपचार सुरू करण्यात आले. मात्र सोमवारी मध्यरात्री दीडच्या सुमारास सर्फराज यांनी उठून पाहिले असता त्याचा श्वासोच्छ्वास बंद झाल्याचे आढळून आले. तातडीने डॉक्टरकडे धाव घेतली असता त्यांनी तपासून हसनैनला मृत घोषित केले. बालकाचा मृत्यू हा देवनार डम्पिंगच्या धुरामुळेच झाला असल्याचा आरोप त्याच्या नातेवाइकांनी केला. त्यामुळे जबाबदार व्यक्तींवर कडक कारवाई करण्यात यावी, अशी मागणी नातेवाइकांनी केली आहे. (प्रतिनिधी)